भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा संघनायक महेंद्रसिंह धोनी याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यामुळे एका सुवर्णयुगाचा अस्त झाला आहे.

चाणाक्ष बुद्धिबळपटूप्रमाणे मैदानी चाली रचण्यात पटाईत असलेल्या धोनीचे नेतृत्व, एकेरी धाव घेण्यातील चापल्य आणि मोक्याच्या क्षणी सामन्याचा निकाल फिरवण्याचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे होते. त्यामुळेच क्रिकेटविश्वातील त्याचे वेगळेपण सातत्याने अधोरेखित झाले.

गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्या सामन्यानंतर धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. धोनीच्या निवृत्तीची चर्चा वारंवार होत असायची; परंतु शनिवारी धोनीने या निवृत्तीच्या चर्चाना पूर्णविराम दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी इंडियन प्रीमियर लीग खेळत राहणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले.

कारकीर्द..

३५०

एकदिवसीय सामने

१०,७७३

धावसंख्या

९०

कसोटी सामने

४८७६

धावसंख्या

रैनाचीही निवृत्ती!

आवडता संघनायक आणि मार्गदर्शक महेंद्रसिंह धोनीच्या पावलांवर पाऊल टाकत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैनानेही शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ‘इन्स्टाग्राम’वर धोनीने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका मिनिटातच रैनानेही निवृत्तीची घोषणा केली.