ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीनं भारतीय संघाचा डाव सावरल्याचे सर्वांनीच पाहिलं. फलंदाजीतील कसब दाखवल्यानंतर नवोदित फिरकीपटूंना त्यानं मार्गदर्शन कलं. यष्टिमध्ये असणाऱ्या माईकच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आवर घालण्यासाठी कशी गोलंदाजी करावी, याचे धोनी युजवेंद्र चहल आणि कुलदीपला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. गोलंदाज भरकटल्याचे दिसल्यानंतर धोनीनं त्यांना कुल अंदाजात सुनावले.

कुलदीपला चेंडू टाकण्यासाठी मार्गदर्शन करुन देखील तो काही वेळा अचूक मारा करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर चहलनेही काही चेंडू फलंदाजाला सहज खेळता येतील असे टाकले. यावेळी धोनी चहलला म्हणाला की, तू देखील ऐकू नकोस! या सामन्यात धोनीच्या मार्गदर्शनामुळेच कुलदीपनं सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांना बाद केलं. तर चहलनं ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड आणि पॅट कमिन्स यांना तंबूचा रस्ता दाखवला.

यष्टीमध्ये रेकॉर्डिंगनुसार धोनी कुलदीपला फलंदाजाला चेंडू खेळण्यास प्रवृत्त कर, चेंडू आत किंवा बाहेर वळवून फलंदाजाला बाद करण्याची संधी घे, असे सांगत मार्गदर्शन करत असल्याचे दिसले. एवढेच नाही जेव्हा कुलदीप भरकटला, तेव्हा धोनीनं त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. चेंडू असा पुढ्यात टाकू नकोस, असे तो म्हणाला. कुलदीपला सल्ला दिल्यानंतर तीच चूक जेव्हा चहलने केली त्यावेळी आता तू ही तेच कर! असे धोनी त्याला म्हणाला.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी ईडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे. मालिकेत आघाडी मिळवल्यानंतर पुन्हा या दोन्ही फिरकीपटूंस कोहली मैदानात उतरवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.