इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार संशय व्यक्त केला गेल्यामुळे नाराज झालेल्या महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राताने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणात धोनीच्या नावाचा उल्लेख झाल्याने त्याने चेन्नईचे कर्णधारपद व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटस कंपनीचे उपाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी एन. श्रीनिवासन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचेसुद्धा समजते. सट्टेबाजी प्रकरणात झालेल्या आरोपांमुळे धोनीची प्रतिमा डागाळली असून, त्यामुळे आपल्या नावाची ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी होऊ शकते या भितीपोटी धोनीने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. मात्र श्रीनिवासन यांनी धोनीची ही विनंती अद्याप स्वीकारलेली नसून दोन्ही बाजूंनी सध्या यावर चर्चा सुरु असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. काही दिवसांपूर्वीच क्रिकेट असोसिएशनचे वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत स्पॉट फिक्सिंगप्रकरणात धोनीने मयप्पनबाबत मुद्गल समितीची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.