जगभरातील क्रिकेटचाहते निवृत्तीबाबत चर्चा करीत असताना गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रेणीनिहाय वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीतून महेंद्रसिंह धोनीला वगळले आहे. त्यामुळे धोनीला हा एक प्रकारे निवृत्तीचा ‘निरोप’च धाडला असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षी एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारत हरल्यानंतर माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे धोनीच्या भवितव्याबाबतच्या चर्चा ऐरणीवर असताना गेल्या आठवडय़ात प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार असल्याचे संकेत दिले होते.

‘बीसीसीआय’ने गुरुवारी ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी श्रेणीनिहाय वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली. गेल्या वर्षी धोनीचा पाच कोटी रुपये मानधन असलेल्या ‘अ’ श्रेणीत समावेश होता. ९ जुलैनंतर स्पर्धात्मक क्रिकेट न खेळलेल्या धोनीला करारबद्ध क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले जाणार नाही, हे अपेक्षितच होते. परंतु यासंदर्भात त्याच्याशी चर्चा करण्यात आल्याचे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्तीविषयी जाहीरपणे बोलत नसल्याने अजून संभ्रम कायम आहे. धोनीची निवड फक्त सध्याच्या कामगिरीवर आधारित होईल, असे मुख्य निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट  केले आहे.

सद्य:स्थितीत धोनी हा या वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवेल असे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी विश्वचषकानंतर धोनी वेस्ट इंडिज दौऱ्याला मुकला होता. तसेच मायदेशातील दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेतही तो खेळलेला नाही.

कारकीर्द  

  • धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये ५० षटकांचा विश्वचषक जिंकला आहे.
  • ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळलेल्या धोनीने १७ हजार धावांहून अधिक धावा केल्या असून यष्टीमागे ८२९ बळी मिळवले आहेत.