‘कॅप्टन कूल’ आणि आपल्या अनपेक्षित निर्णयांनी भल्याभल्यांच्या दांड्या गूल करणारा माही अर्थात महेंद्रसिंग धोनी याने टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याचवेळी धोनीच माझा कॅप्टन राहील, अशी भावूक प्रतिक्रिया देणारा टीम इंडियाचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीने धोनीने संघाला दिलेल्या आणखी एका ‘विराट’ देणगीचा उल्लेख केला आहे. धोनीने मला अनेक संधी दिल्या. मला संघातून बाहेर होण्यापासून वाचवले, असे विराटने सांगितले.

कोहलीने २००८ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत विराटचे फलंदाजीत सातत्य नव्हते. त्याचवेळी धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझे संघातील स्थान मजबूत केले. बीसीसीआय. टीव्हीच्या वृत्तानुसार, धोनी सुरुवातीच्या काळात माझा मार्गदर्शक होता. त्याने मला अनेक संधी दिल्या. माझी क्रिकेट कारकीर्द बहरण्यासाठी मला खूप वेळ दिला. मला संघातून बाहेर होण्यापासून वाचवले, असे विराटने सांगितले.

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची जागा घेणे सहज शक्य नाही. त्याची जागा भरून काढणे सोपे नाही, असे कोहली म्हणाला. महेंद्रसिंग धोनीविषयी तुम्ही जेव्हा विचार करता, त्यावेळी आपसूकच कर्णधार हा पहिला शब्द ओठांवर येतो. माझ्यासाठी धोनी कायम कर्णधारच राहील, असेही तो म्हणाला. दरम्यान, धोनीने बुधवारी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवड समितीने विराट कोहली याची कर्णधारपदी निवड केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. १५ जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना होणार असून, धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगलाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.