परदेशातील खेळपट्टय़ांवरील भारताच्या खराब कामगिरीमुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर तीव्रतेने टीका होत आहे. परंतु तरीही धोनीच्या नेतृत्वाबाबत भारतीय क्रिकेटधुरिणांमध्ये मात्र सकारात्मकताच असल्याचे चित्र दिसत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला एकही विजय मिळवता आला नाही. ऑकलंडची पहिली कसोटी भारताने ४० धावांनी गमावली आणि मग वेलिंग्टन कसोटीत भारताच्या तोंडातून न्यूझीलंडने विजयाचा  घास हिरावला. त्यामुळे ती कसोटी अनिर्णीत राहिली. भारताने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ०-४ अशा फरकाने, तर कसोटी मालिकेत ०-१ अशी हार पत्करली. धोनीच्या स्थानाला सध्या तरी धोका दिसत नसला तरी त्याला सावधगिरीचा हा इशारा मात्र नक्कीच असेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून गेले तीन महिने धोनीसेनेला विजयाचे दर्शन घडलेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत ०-२ आणि कसोटी मालिकेत ०-१ अशा फरकाने भारत हरला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ अखेरचा जिंकला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूरला झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तो विजय मिळवला होता. याच प्रतिस्पध्र्याविरुद्ध भारताने परदेशातील अखेरचा कसोटी विजय नोंदवला आहे. २०११मध्ये किंग्स्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने हा विजय साकारला होता. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांविरुद्ध झालेल्या मालिकेत एकही सामना जिंकू शकला नव्हता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने प्रत्येकी ०-४ अशा फरकाने सपाटून मार खाल्ला.
धोनी हा परदेशात सर्वात वाईट कामगिरी बजावणारा कर्णधार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने परदेशातील २३ सामन्यांत नेतृत्व केले आहे आणि यापैकी ११ सामने भारताने गमावले आहेत. हाच प्रश्न न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर जेव्हा धोनीला विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी निकालापेक्षा जी प्रक्रिया सुरू आहे, त्याबाबत बोलेन. इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीचा आणि मागील दोन कसोटी मालिकांमधील भारताच्या कामगिरीचा विचार केला तर, आम्ही फार चांगली प्रगती केली आहे.’’
धोनी जे काही बोलत होता, ते जखमेवर मीठ चोळणारे होते, तरी त्याच्या दृष्टीने सत्य होते. दोन वर्षांपूर्वीचा संघ आणि सध्या त्याच्या संकल्पनेतून उभा असलेला संघ यात अंतर असल्याचेच त्याला मांडायचे असावे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाविरुद्ध पत्करलेल्या त्या मानहानीकारक पराभवाप्रसंगी धोनीसोबत झहीर खान, इशांत शर्मा, आर. अश्विन आणि विराट कोहली हेच खेळाडू होते. यापैकी धोनी, झहीर आणि इशांत दोन्ही मालिका खेळले, तर उर्वरित दोघांनी फक्त ऑस्ट्रेलियातील पराभवाची अनुभूती घेतली. वृद्धिमान साहा आणि रोहित शर्मा हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघात होते, परंतु त्यांना खेळायची संधी मिळाली नव्हती.
धोनीच्या स्वप्नातील संक्रमण संपलेले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या युगाचा अस्त झाला आहे. हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. झहीर आपल्या कसोटी कारकीर्दीतील अखेरच्या पर्वात दिसत आहे.
भारताला ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्याची किमया साधणारा धोनी सामन्यानंतर म्हणाला होता की, ‘‘सांख्यिकीदृष्टय़ा जे काही घडले ते आणि आपली कुठे सुधारणा झाली ते मांडणे महत्त्वाचे असते. परंतु एकंदर भारताची कामगिरी चांगली झाली असे म्हणता येऊ शकेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड अशा दोन्ही ठिकाणच्या खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजांना अनुकूल होत्या. भारताच्या गोलंदाजांची कामगिरी या दोन्ही ठिकाणी चांगली झाली.’’