भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) निवडलेल्या सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला असून आयसीसी एकदिवसीय संघाचे कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर धोनीला आयसीसीचा पीपल्स चॉईस पुरस्कारही देण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी आयसीसीच्या पुरस्कारांत सुद्धा धोनीनेच बाजी मारली आहे.
दरवर्षी आयसीसी मार्फत जाहीर करण्यात येणाऱया पीपल्स चॉईस पुरस्कारासाठीच्या यावेळीच्या शर्यतीत धोनीबरोबर भारताचा युवा फलंदाज विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मायकेल क्लार्क, इंग्लंडचा ऍलिस्टर कूक, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश होता. पण, या सर्वांना मागे सारत महेंद्रसिंह धोनीने हा पुरस्कार पटाकाविला आहे.
त्याचबरोबर आयसीसीने यावर्षीचा सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघ देखील जाहीर केला. यातील एकदिवसीय संघाचे कर्णधारपद धोनीकडे तर, संघात सलामीवीर म्हणून शिखर धवनची निवड करण्यात आली. त्याचबरोबर अष्टपैलू रविंद्र जडेजालाही संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, यावर्षी सर्वाधिक धावा करूनही भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीचा आयसीसीच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही.
 
आयसीसीचा कसोटी संघ – (फलंदाजी क्रमवारीनुसार नावे)
ऍलिस्टर कूक (इंग्लंड), चेतेश्वर पुजारा (भारत), हाशीम आमला (दक्षिण आफ्रिका), मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया), मायकेल हसी (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), महेंद्रसिंह धोनी (भारत), ग्रेम स्वान (इंग्लंड), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), जेम्स अँडरसन (इंग्लंड), वेरनॉन फिलँडर (दक्षिण आफ्रिका). १२वा खेळाडू- आर.अश्विन (भारत)

आयसीसीचा एकदिवसीय संघ- (फलंदाजी क्रमवारीनुसार नावे)
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका), शिखर धवन (भारत), हाशीम आमला (दक्षिण आफ्रिका), कुमार संगकारा (श्रीलंका), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), महेंद्रसिंह धोनी ( कर्णधार-भारत), रविंद्र जडेजा (भारत), सईद अजमल (पाकिस्तान), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड), लसीथ मलिंगा (श्रीलंका). १२वा खेळाडू- मिचेल मच्च्लेनाघन (न्यूझीलंड)