महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातून निवृत्ती घ्यावी की नाही, यावरुन पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय माजरेकर यांनीही धोनीने टी-२० आणि वन-डे सामन्यांमधून निवृत्ती घ्यावी, असं मत व्यक्त केलं आहे. भारताच्या वेस्ट इंडीज आणि श्रीलंका दौऱ्यात धोनीच्या संथ खेळीमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. मध्यंतरीच्या काळात राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, अजित आगरकर, वीरेंद्र सेहवाग यासारख्या माजी खेळाडूंनीही धोनीने निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला जाहीपणे आपला पाठींबा दर्शवला. धोनीला पाठींबा देताना प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीका करणाऱ्या खेळाडूंनी एकदा स्वतःच्या करिअरमध्ये आपण काय केलं याकडे बघण्याचा सल्लाही दिला होता. त्यानंतरही संजय मांजरेकरने धोनीला निवृत्तीचा सल्ला दिल्यानंतर हा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलाय.

अवश्य वाचा – धोनीबाबतचा निर्णय निवड समिती घेईल

“याआधी धोनीने भारताला अनेक कठीण प्रसंगातून वाचवत सामना जिंकवून दिला आहे. यासाठी आपण सर्वजण त्याला ‘गेमचेंजर’ म्हणून ओळखत होतो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये धोनीचा खेळ ‘गेमचेंजर’सारखा राहिलेला नाहीये. याआधी धोनीच्या फलंदाजीत सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकण्याची ताकद होती, मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ आता धोनीऐवजी इतर खेळाडूंवर अवलंबून राहतो”, असं म्हणत मांजरेकर यांनी लक्ष्मण, आगरकर, सेहवाग यासारख्या खेळाडूंना आपला पाठिंबा दर्शवला.

अवश्य वाचा – धोनीवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या करिअरकडे बघावे : रवी शास्त्री

“एखादा खेळाडू संघाबाहेर बसून धोनीसारखीच किंवा धोनीपेक्षा चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संघात कधी ना कधी जागा मिळायलाच हवी. धोनी अजून किती काळ संघात खेळणार या मुद्द्यावर आपण शांतपणे, कोणताही पूर्वग्रह मनात न धरता चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा. जर आगामी काळात आपण या गोष्टी करु शकलो तर खेळासाठी हे कायम फायदेशीर ठरेल”, असंही मांजरेकर म्हणाले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीने फक्त टी-२० आणि वन-डे सामने खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये मैदानात त्याचा खेळ पाहून त्याच्या निवृत्तीबाबतची चर्चा सुरु झाली आहे. अनेकवेळा धोनीचे चाहते त्याच्यावर झालेली टीका हे सकारात्मक पद्धतीने घेत नाहीत, यावरही मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो हे सांगायलाही मांजरेकर विसरले नाहीत.

अवश्य वाचा – निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना धोनीने दिले उत्तर

सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि वन-डे सामन्यांच्या मालिकेत धोनीला भारतीय संघात जागा मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेत चांगला खेळ करुन आपल्या टीकाकारांची तोंडं बंद करण्याची संधी धोनीकडे आहे, या संधीचा धोनी कसा लाभ घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – महेंद्रसिंह धोनीवर टीका करणं अयोग्य, विराट कोहलीकडून धोनीचा बचाव