सध्या भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्या फॉर्मवरून त्याला संघात जागा मिळावी की नाही, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी धोनीचं वाढत वय पाहता त्याला टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. २०१९ चा विश्वचषक लक्षात घेऊन धोनीने केवळ वन-डे सामन्यांवर आपलं लक्ष केंद्रीत करावं असं मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केलं होतं. मात्र, सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री हे धोनीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपल्या कर्णधारपदाच्या काळात धोनीने भारताला जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून दिलं होतं. सौरव गांगुलीनंतर महेंद्रसिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. ‘द प्रिंट’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत धोनीने आपल्या कर्णधारपदाची संधी कशी मिळाली, याचा खुलासा केला आहे.

” मला कर्णधारपद मिळण्यात अनेक सिनीअर खेळाडूंचा वाटा होता. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मला कर्णधारपद मिळणं हे निव्वळ अशक्य होतं. ज्यावेळी कर्णधारपदासाठी निवड समिती आणि सिनीअर खेळाडूंची चर्चा झाली तेव्हा मला या गोष्टीची जराशीही कल्पना नव्हती. पण इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना माझ्यातला प्रामाणिकपणा आणि कठीण परिस्थिती हाताळण्याचं कसब या गुणांमुळे मला कर्णधारपद मिळालं असं मला वाटतं.” असे धोनीने सांगितले. याशिवाय, त्याने काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

अवश्य वाचा – Video: जेव्हा धोनी डॉग ट्रेनर बनतो…

“ज्यावेळी मला कर्णधारपदासाठी विचारणा करण्यात आली, तेव्हा मी संघातला सर्वात तरुण खेळाडू होतो. त्यापूर्वी जेव्हा सचिन, सौरवसारखे सिनीअर खेळाडू सामन्यात एखादा निर्णय घेण्याविषयी मला विचारायचे तेव्हा मी प्रत्येकवेळी न घाबरता माझे मत त्यांच्यासमोर मांडायचो. या सगळ्याचा पुढील काळात मला खूप मोठा फायदा झाला. २००७ साली सौरव गांगुलीनंतर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यासारख्या दिग्गज खेळाडुंना डावलत बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली होती. विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, युवराज सिंह यांसारख्या मातब्बर खेळाडूंऐवजी बीसीसीआयने धोनीला संधी दिली होती.

धोनीला कर्णधारपदी बढती मिळण्यात सचिन तेंडुलकराचाही मोठा वाटा होता. सिनीअर खेळाडूऐवजी बीसीसीआयने तरुणांना संधी द्यावी असं मत सचिन तेंडुलकरने मांडलं होतं. मात्र धोनीने यावेळी आपले मैदानात सचिनशीही अनेकदा मतभेद झाल्याचं मान्य केलं. मात्र प्रत्येक कठीण प्रसंगात सचिन तेंडुलकर आपल्यापाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं धोनी म्हणाला. २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने वन-डे क्रिकेट सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. यानंतर कसोटी सामन्यांमधून अनिल कुंबळेने निवृत्ती स्विकारल्यानंतर धोनीला भारताच्या कसोटी संघाचंही कर्णधार करण्यात आलं होतं.

अवश्य वाचा – धोनीवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या करिअरकडे बघावे : रवी शास्त्री