संघाला गरज असताना वेगानं धावा गोळा करत भारताला विजयी लक्ष्य गाठून देण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरोधात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत असून भारत 0-1 असा पिछाडीवर आहे. मंगळवारी दुसरा सामना खेळवण्यात येणार असून मालिकेतलं आव्हान कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागेल.

हार्दिक पांड्यावर झालेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे अचानक मधल्या फळीत पोकळी निर्माण झाली आहे. उपकर्णधार रोहित शर्मानं शानदार 22वं शतक झळकावूनही भारताला पहिला सामना जिंकता आला नाही. महेंद्रसिंग धोनीनं 96 चेंडूमध्ये 51 धावा केल्या आणि भारतानं 34 धावांनी सामना गमावला. सध्या धोनी पाचव्या स्थानावर फलंदाजीला येत असून त्यानं पाचव्या क्रमांकावर यावं का चौथ्या याबाबत मतभिन्नता आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना धोनीनं जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत. तसेच् स्ट्राइक रेटचा विचार केला तर तो देखील चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 94.21 इतका आहे, तर त्याचा कारकिर्दीतील एकूण स्ट्राइक रेट 87.60 आहे.

मागील काही वर्षे धोनीसाठी खडतर राहिली आहेत. गेल्या वर्षभरात धोनीची सरासरी 24.75 आहे तर स्ट्राइक रेट 77.34 आहे. भारताला उरलेले दोन सामने जिंकायचे असतील तर केवळ विराट व रोहितवर अवलंबून राहून चालणार नाही तर त्यासाठी मधल्या फळीमध्ये महेंद्रसिंग धोनीवरही संघाची मदार असेल. धोनीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं असा रोहित शर्माचाही आग्रह आहे. मात्र सध्या अंबती रायडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दिनेश कार्तिकला बसवून केदार जाधवला खेळवण्याचा प्रयोग केला जाईल का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

रवींद्र जाडेजा, दिनेश कार्तिक, शिखर धवन व अंबती रायडू हे फलंदाज पहिल्या सामन्यात अपयशी ठरले असताना संघात बदल केला जाणार नाही का बदल करून अन्य  खेळाडूंना संधी दिली जाईल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.