क्रीडापटूंच्या कारकिर्दीला वयाची मर्यादा असते. तिशी-पस्तिशीत क्रीडापटू स्पर्धात्मक खेळाला अलविदा करतात. व्यस्त वेळापत्रक, सततचा प्रवास, दुखापती यामुळे खेळाडूंना पर्यायी कारकीर्द घडवण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. मात्र आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दुहेरी प्रकारात भारताची पताका समर्थपणे फडकवतानाच महेश भूपतीने उद्योजक म्हणून समांतर ओळख प्रस्थापित केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रदीर्घ अनुभवामुळे जगभरातल्या खेळाडूंशी असलेली मैत्री, स्पर्धाच्या निमित्ताने विश्वसंचारातून टेनिसबाजाराचा केलेला अभ्यास यातूनच इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) संकल्पना जन्माला आली. लीगच्या उलाढालीचे केंद्र दुबई निश्चित करून फ्रँचाइजी, लिलाव आणि खेळाडूंना मिळालेली रक्कम हे सर्व जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवत भूपतीने व्यावहारिक चातुर्य दाखवले आहे.     
१९९९मध्ये भूपती-लिएण्डर पेस जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. या ऐतिहासिक घटनेचे बाजारमूल्य गणले गेले नाही. खेळाडूंचे करार, जाहिराती, ब्रँडिंग, र्मचडाइज यासंदर्भात संघटनेची गरज ओळखून भूपतीने ‘ग्लोबोस्पोर्ट्स’ कंपनीची स्थापना केली. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांना करारबद्ध करत भूपतीच्या कंपनीने कॉर्पोरेट विश्वाला आगमनाची वर्दी दिली. हळूहळू कारभार वाढवणाऱ्या या कंपनीचा वार्षिक ताळेबंद १५०० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी विम्बल्डनचे ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या अँडी मरेला करारबद्ध करत भूपतीच्या कंपनीने जागतिक स्तरावर मुसंडी मारली आहे.
२००९मध्ये कंपनीने दूरचित्रवाणी, चित्रपट निर्मिती, नवमाध्यमे, जनसंपर्क आणि चित्रपटांसाठी पात्रनिवड असा आपला पसारा वाढवला. देशातला सर्वोत्तम डिझायनरचा शोध घेणारा ‘मेकिंग द कट’, तर ‘द पिच’ नावाचा उद्योगजगताचा रिअ‍ॅलिटी शो, ‘चलो दिल्ली’ चित्रपट ही भूपतीच्या बिग डॅडी प्रॉडक्शनची निर्मिती. दाक्षिणात्य चित्रपटांची लोकप्रियता हेरत ग्लोबोस्पोर्ट्सने सौंदर्या रजनीकांत यांच्या ऑचर स्टुडिओशी संलग्न होत टॉलीवूड इंडस्ट्रीतही प्रवेश केला. वीरेंद्र अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या कंपनीशी संलग्न झालेल्या बिग डॅडी प्रॉडक्शनचे चार चित्रपट निर्मिती टप्प्यात आहेत.
टेनिसपटू घडवण्यात आपला अनुभव कामी येऊ शकतो, हे लक्षात घेऊन भूपतीने ‘महेश भूपती टेनिस अकादमी’ची स्थापना केली. टेनिसचे महागडे स्वरूप लक्षात घेता, या अकादमीद्वारेही भूपतीने व्यावसायिक हित जपले आहे. व्यावसायिक क्रीडापटू म्हणून वाटचाल करतानाच कॉर्परेरेट विश्वातही केवळ नाममात्र भागीदार न राहता सक्रिय सहभागासह भूपतीने दुहेरी सव्‍‌र्हिस साधली आहे.
भारतभेटीने फेडरर भारावला!
‘इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल)च्या निमित्ताने मी भारतात येईन’ असे त्याने ‘ट्विटर’वर जाहीर केले आणि त्याच्या भारतीय चाहत्यांनी व्हच्र्युअल जल्लोष केला. ‘‘भारताची संस्कृती समजून घेण्यासाठी फिरायचे आहे. कुठे जाऊ, काय पाहू? हे फोटोशॉपच्या माध्यमातून सांगा!’’ या रॉजर फेडररच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसादही अचंबित करणारा होता. त्यानंतर भारतात येऊन फेडररने टेनिसचाहत्यांची मने जिंकली. ‘‘दिल्लीत घालवलेले अविस्मरणीय क्षण कायम स्मृतीत राहतील. नवी दिल्ली-मनापासून आभार! चाहत्यांचा विलक्षण आणि थक्क करणारा पाठिंबा. तुमचा ऋणी आहे!’’ अशा भावुक ‘ट्विट’सह फेडररने भारतीय चाहत्यांना अलविदा केले.