भारताचा अव्वल टेनिसपटू महेश भूपतीच्या संकल्पनेतून इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धा साकारली आहे. टेनिस विश्वाला नवा आयाम देणाऱ्या या स्पर्धेचा पहिलावहिला हंगाम काही दिवसांतच सुरू होत आहे. पहिल्या हंगामात चार संघांमध्ये जेतेपदासाठी मुकाबला होणार आहे. मात्र २०२० पर्यंत संघांची संख्या दुप्पट होईल असा विश्वास भूपतीने व्यक्त केला.
पुढील सहा वर्षांत चीनचा एक संघ असावा आणि चीनमध्ये स्पर्धेचा एक टप्पा आयोजित करण्याची इच्छा असल्याचे भूपतीने सांगितले. स्पर्धा व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. खेळाच्या विकासाबरोबरच ही लीग व्यावसायिकतेचे शाश्वत प्रारूप असावे. आम्हाला अनाठायी आक्रमण होण्याची गरज नाही. मात्र ही लीग व्यापारीदृष्टय़ाही यशस्वी होईल, असा विश्वास भूपतीने व्यक्त केला.
तो म्हणाला, ‘१२५ देशांतील ५०० दशलक्ष घरातील टेनिस चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. पारंपरिक टेनिस स्पर्धाची चौकट मोडून काढणारी ही लीग स्पर्धा क्रांतिकारी संकल्पना आहे.
रंजकता वाढावी यासाठी एक  सेटचे सामने असणार आहेत. खेळाच्या जोडीला चाहत्यांना मनोरंजनाची भेट मिळावी असा प्रयत्न आहेत.’