१० वर्षांपूर्वी एका दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आर्थर अँटय़ुनेस कोइम्ब्रा अर्थात झिको हे आता तीन महिन्यांसाठी भारतात येणार आहेत. भारतीय फुटबॉलमध्ये व्यावसायिकता आणण्याचे मुख्य ध्येय ब्राझीलचे महान फुटबॉलपटू झिको यांनी बाळगले आहे. इंडियन सुपर लीगमधील गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले झिको म्हणाले, ‘‘जपान, ग्रीस, तुर्कस्तान, इराक, रशिया आणि उझबेकिस्तान या शहरांमध्ये माझे वास्तव्य असल्यामुळे विविध वातावरणांशी जुळवून घेण्याचा माझा दांडगा अनुभव आहे. भारतातील वातावरणाशी आणि संस्कृतीशी जुळवून घेणे मला कठीण जाणार नाही. पण भारतीय फुटबॉलपटू व्यावसायिकपणा कसा अंगिकारतात, हे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे. व्यावसायिकपणा म्हणजे फक्त चांगले फुटबॉल खेळून चालणार नाही तर संघटना मजबूत करणे, सरावात कठोर परिश्रम घेणे, भविष्यासाठी रणनीती आखणे. भारतात जाऊन इंडियन सुपर लीग स्पर्धा जिंकण्यात मोठे कर्तृत्व नाही. तर भारतीय फुटबॉलमध्ये सुधारणा घडवणे, हे आव्हानात्मक असणार आहे.’’