चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं भारताचा दारुण पराभव केल्यानंतर केवीन पीटरसन यानं आपल्या एका जुन्या ट्विटचा हवाला देत भारतीय संघावर आणि चाहत्यांवर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय संघानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पीटसन यानं भारतीय संघाला सल्ला दिला होता. याचीच आठवण करुन देत पीटरसन यानं पुन्हा एकदा ट्विट केलं आहे.

भारतीय सघानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभव केल्यानंतर पीटरसन यानं ट्विट करत इशारा दिला होता. आता इंग्लंड संघानं भारताचा पराभव केल्यानंतर केविन पीटरसन याने ट्विटरद्वारे भारतीय संघाला आपण दिलेल्या चेतावणीची आठवण करुन दिली आहे.

काय म्हणाला पीटरसन?
“भारत, आठवण आहे ना. मी फार पुर्वीच, तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांना पराभूत केल्यानंतर जास्त आनंद साजरा करू नका अशी चेतावणी दिली होती.”

याआधी काय केलं होतं ट्विट?
“भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे. परंतु खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे. त्याला तुमच्या घरात पराभूत करावे लागेल. “सतर्क रहा. दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा.”

चेन्नई येथे रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं यजमान भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव केला. या विजयासाह इंग्लंड संघानं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. १३ फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान दुसरा कसोटी सामना चेन्नईमध्येच रंगणार आहे.