माझ्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधार समिती (सीआयसी) कायम ठेवा, अशा आशयाचे पत्र भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) नवनियुक्त लवाद अधिकारी न्यायमूर्ती विजया ताहिलरामानी (निवृत्त) यांना पाठवले आहे.

दोन कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या राजपूत यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधार समितीत माजी कसोटीपटू राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांचा समावेश होता. ‘‘१८ फेब्रुवारी २०२१ रोजी पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत माझ्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधार समिती रद्दबातल ठरवण्यात आली आहे. ती तात्काळ स्वरूपात कायम ठेवण्यात यावी. त्याचबरोबर नव्याने नियुक्त करण्यात आलेली क्रिकेट सुधार समिती अवैध आहे,’’ असा दावाही त्यांनी केला.

परस्पर हितसंबंधाच्या मुद्द्यावरून राजपूत यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधार समिती रद्दबातल ठरवण्यात आली होती, असे समजते. मात्र राजपूत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. स्थापनेपासून ते ही समिती रद्दबातल करेपर्यंतचा घटनाक्रम राजपूत यांनी या पत्रात मांडला आहे. आमच्या समितीने मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार याची नियुक्ती केली होती. एमसीएच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मात्र अमोल मुझुमदारला प्रशिक्षकपदी नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजय हजारे करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.