गुणवत्ता तर तिच्याकडे होतीच, त्याला जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची जोड होती. जिल्ह्य़ामध्ये एकामागून एक जेतेपदे मिळवत असतानाच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू होण्याच्या निर्धारासह ती रत्नागिरीहून मुंबईला आली.  त्यानंतर पश्चिम विभागीय अजिंक्यपद आणि मुख्तार अहमद चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा जिंकत तिने आपला हा निर्धार सत्यात उतरवला. आता राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद तिला खुणावत आहे. ‘‘राज्यस्तरीय आणि पश्चिम विभागीय स्पर्धा जिंकल्यावर आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. त्यामुळेच राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे ध्येय मी ठेवले आहे,’’ असे मैत्रेयी सांगते.
मुख्तार अहमद चषकाच्या अंतिम फेरीत मैत्रेयीपुढे माजी राष्ट्रीय विजेती संगीता चांदोरकर हिचे आव्हान होते, याविषयी विचारल्यावर मैत्रेयी म्हणाली की, ‘‘अनुभवाला फार महत्त्व असते. दडपण तर होतेच, पण हरायचे तर चांगले खेळून, हे मी ठरवले होते. जसा खेळ होत गेला तसा माझा आत्मविश्वास आणि जिंकण्याची ईर्षां वाढत गेली. चांदोरकर हरल्या, पण पराभूत झाल्यावरही खेळभावनेने त्यांनी माझे अभिनंदन केले आणि ते मला आवडले.
तुझ्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढता आहे, तू कोणाकडून प्रशिक्षण घेतेस असे विचारल्यावर मैत्रेयी म्हणाली की, ‘‘मी बऱ्याच जणांकडून प्रशिक्षणाचे धडे घेत आहे. त्यामध्ये सुहास कांबळी, अरुण केदार, महेंद्र तांबे या नावाजलेल्या मंडळींचा सहभाग आहे. खेळ सोपा असतो पण अडचणीच्या वेळी तुम्ही कसे खेळता याला महत्त्व असते. छोटय़ा चुकांमुळे कधी कधी पराभव असतो, त्या कशा टाळाव्यात, हे मला इथे येऊन शिकायला मिळाले.’’
रत्नागिरीहून मुंबईला येण्याचा आणि कॅरममध्ये कारकीर्द घडवण्याच्या निर्णयाविषयी मैत्रेयी म्हणाली की, ‘‘रत्नागिरीमध्ये चांगली कामगिरी होत असताना इयत्ता सातवीला मी राष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेली होती. त्यानंतर काही शिबिरे रत्नागिरीत झाली. रत्नागिरी छोटे शहर असल्याने स्पर्धा कमी होती. त्यामुळे मुंबईला येऊन कॅरममध्येच कारकीर्द घडवण्याचा विचार केला.’’
खेळाचा आलेख चढता असताना अभ्यासाचा आलेख कुठपर्यंत आला आहे, असे विचारल्यावर मैत्रेयी म्हणाली की, ‘‘सध्या मी वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षांला आहे, त्याचबरोबर सीए अभ्यासक्रमसुद्धा करत आहे. अभ्यास सांभाळत दिवसाला तासभर कॅरमचा सराव करते. खेळाबरोबर शिक्षणही महत्त्वाचे असल्याची जाणीव नक्कीच मला आहे. घरच्यांचाही मला पूर्णपणे पाठिंबा असून रत्नागिरी, मुंबई आणि महाराष्ट्राच्या असोसिएशन्सने मला नेहमीच पांठिबा दिलेला आहे.’’