हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला सुर्वण दिवस आणले. त्यांच्या कामगिरीचे अनेक किस्से नेहमी चर्चिले जातात. असाच एक किस्सा आहे हिटलरसोबतचा. ध्यानचंद यांनी चक्क जर्मनीचा हुकूमशाह हिटलरनं दिलेला प्रस्ताव धुडकावून लावल्याचा.

साल होतं १९३६. तारीख १५ ऑगस्ट. घटना आहे बर्लिन ऑलम्पिकमधील. बर्लिनमध्ये भारत आणि जर्मनीच्या संघात हॉकीचं अंतिम सामना होणार होता. हा सामना बघण्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं होतं, पण एक तणावही मैदानात जाणवत होता. कारण होत हा सामना बघण्यासाठी खुद्द हुकूमशाह हिटलरच बघण्यासाठी येणार होते. भारतीय संघ फ्रान्सचा दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यात पोहोचलेला होता. फ्रान्ससोबतच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ध्यानचंद यांनी जर्मनीविरूद्धच्या अंतिम सामन्यातही आपली जादू दाखवून दिली. ध्यानचंद यांनी जर्मनीविरुद्ध खेळताना ६ गोल केले होते. भारतानं जर्मनीचा ८-१ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. पण, त्यानंतर जे घडलं ते भारतासाठी सुवर्ण पदकापेक्षाही अभिमानास्पद होतं. हा सामना बघण्यासाठी आलेल्या हिटलर यांनी ध्यानचंद यांच्या कामगिरीला सलाम केला. पुरस्कार वितरण सोहळ्यात हिटलरने मेजर ध्यानचंद यांना जर्मनीच्या लष्करात सामील होण्याचा व जर्मनीचं नागरिकत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर ध्यानचंद यांनी “भारत विक्रीसाठी नाही,” असं उत्तर हिटलरला दिलं होतं. त्यानंतर मैदानात काही काळ शांतता पसरली होती. भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक सय्यद अली सिब्ते नकवी यांनी हा किस्सा सांगितलेला आहे.

मेजर ध्यानचंद कोण?

ध्यानचंद यांचा जन्म अलहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ साली राजपुत घराण्यात झाला. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यान सिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.