सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलण्यात मोठी भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची आक्रमक ओळख तयार करुन देण्यात गांगुलीचा मोठा वाटा आहे. यासोबत संघातील खेळाडूंना खडतर काळात पाठींबा देऊन त्यांच्याकडून चांगली कामगिरी करवून घेण्यासाठीही गांगुली ओळखला जातो. गंभीर, सेहवाग, पठाण अशा अनेक नवोदीत खेळाडू गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने एका कार्यक्रमात बोलत असताना, गांगुलीने फॉर्मात नसलेल्या सेहवागकडून चांगली कामगिरी करवून घेण्यासाठी त्याला सुनावलेल्याचा किस्सा सांगितला.

“सौरवने आपल्या काळात प्रत्येक भारतीय खेळाडूला योग्य संधी दिली. काही वर्षांपूर्वी युवराज सिंह वाईट फॉर्मात असूनही दादाने त्याला पाठींबा दिला. याचप्रमाणे विरेंद्र सेहवागही काही काळासाठी खराब खेळत होता. तेव्हा दादाला अक्षरशः सेहवागला चांगली कामगिरी करण्यासाठी गयावया करावं लागलं होतं. एका सामन्याआधी सौरवने सेहवागपाशी जात सांगितलं, आज जर चांगला खेळला नाहीस तर यापुढे मी तुला संधी देणार नाही. सुदैवाने त्या सामन्यात सेहवागचा फॉर्म परतला आणि त्याने शतक झळकावलं.” आकाश चोप्रा एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

संधी मिळूनही आकाशला प्रदीर्घ काळ भारतीय संघात खेळता आलं नाही. याबद्दल विचारलं असता आकाश म्हणाला, “ती पूर्णपणे माझी चूक आहे. मला संधी होती पण मी कधीही ४०-५० धावांचं शतकात रुपांतर करु शकलो नाही. कोणीही माझी बॅट पकडलेली नव्हती. संघात मला एक विशिष्ठ भूमिका दिली होती, ती भूमिका मी जरा सिरीअसली घेतली, त्यासाठी मी माझ्या खेळातही बदल केला”, आकाश आपल्या फलंदाजीविषयी बोलत होता.

अवश्य वाचा – 2007 T-20 WC : सचिन-सौरवला व्हायचं होतं स्पर्धेत सहभागी, ‘या’ खेळाडूमुळे हुकली संधी