मलेशिया बॅडमिंटन ओपन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरीनवर सनसनाटी मात केली आहे. २२-२०, २१-१८ अशा दोन सेट्समध्ये मरीनची झुंज मोडीत काढत सिंधूने उपांत्य फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे.
पहिल्या सेटमध्ये सिंधूने १ गुण कमावत आघाडी घेतली. मात्र कॅरोलिना मरीनने आपला आक्रमक खेळ दाखवत सिंधूला मोठी आघाडी घेण्याची संधी दिलीच नाही. मात्र सिंधूने मरीनच्या आक्रमणचा मुकाबला करत ५-३ अशी आघाडी कायम ठेवली. मध्यांतरापर्यंत सिंधूने ११-१० अशी एका गुणाची आघाडी घेतली. मध्यांतरानंतर मरीनने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. काही क्षणांसाठी मरीनने सिंधूशी बरोबरीही केली. मात्र सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत पहिला सेट २२-२० असा खिशात घातला.
पहिल्या सेटमध्ये मरीनने दिलेली झुंज पाहता दुसरा सेट अटीतटीचा होणार हा अंदाज सर्वांनी बांधला होता. याप्रमाणे कॅरोलिनाने पहिल्या क्षणापासून आक्रमक खेळ करत सिंधूवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र सिंधूने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंतही सिंधूने ११-६ अशी आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरानंतर मात्र सिंधूने मरीनला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. २१-१८ अशा फरकाने दुसरा सेटही जिंकत सिंधूने सामनाही आपल्या नावे केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 6:35 pm