भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालसाठी २०१३ हे वर्ष दु:स्वप्न ठरले. खराब फॉर्म आणि दुखापती यामुळे सायनाला गेल्या वर्षी एकाही जेतेपदाची कमाई करता आली नाही. नवीन वर्षांत नव्या उर्जेने, त्वेषाने खेळण्याचा निर्धार सायनाने व्यक्त केला होता. मात्र मलेशियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सायनाची कामगिरीत आणि क्रमवारीत घसरण होत असताना दमदार वाटचाल करणाऱ्या सिंधूलाही दुसऱ्या फेरीचा अडसर ओलांडता आला नाही. महिला गटात भारताची निराशा झाली असताना पुरुष गटात मात्र युवा खेळाडू कदम्बी श्रीकांतने संघर्षपूर्ण विजय मिळवत भारताची शान राखली.
थकव्याचे कारण देत सायनाने कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली होती. पुरेशा विश्रांतीनंतर ती मलेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाली होती. मात्र या पराभवामुळे खराब फॉर्मचे शुक्लकाष्ठ संपले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बिगरमानांकित चीनच्या झ्यू याओने सायनावर १६-२१, २१-१०, २१-१९ असा विजय मिळवला.
दमदार खेळ करत सायनाने पहिला गेम सहजतेने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये याओच्या जलद आक्रमणापुढे सायना नामोहरम झाली. याओने सुरुवातीला अल्प आघाडी घेतली, हीच आघाडी नियमित अंतराने वाढवत याओने दुसरा गेम नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने चिवटपणे खेळ करत ७-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर १०-८ अशी आगेकूच केली. मात्र या स्थितीतून याओने १०-१० अशी बरोबरी केली आणि त्यानंतर १८-१४ अशी आघाडी घेतली. सायनाने झुंजार खेळ करताना सलग तीन गुणांची कमाई करत १७-१८ अशी पिछाडी भरून काढली. मात्र यानंतर याओने आपला खेळ उंचावत उर्वरित गुणांची कमाई करत दिमाखदार विजय मिळवला.
कोरियाच्या सहाव्या मानांकित यिआन ज्यु बे हिने सिंधूवर २१-१६, २१-१९ अशी मात केली. सिंधूने पहिल्या गेममध्ये ६-३ अशी आघाडी घेतली. बे हिने सलग सहा गुणांची कमाई करत १०-६ अशी आघाडी मिळवली. यानंतर सिंधूने झुंजार खेळ करत १३-१४ अशी पिछाडी भरून काढली. मात्र यानंतर बेने दिमाखदार खेळ करत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ६-६ अशी बरोबरी होती. सिंधूने १९-१५ अशी आघाडी घेतली, मात्र यानंतर याओने सलग सहा गुणांची कमाई करत थरारक विजय मिळवला.  
पुरुषांमध्ये राष्ट्रीय विजेता कदम्बी श्रीकांतने कोरियाच्या वान हो सनचा ११-२१, २१-१९, २१-१९ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.