खराब फॉर्म आणि दुखापती यामुळे सायना नेहवालला २०१३ मध्ये एकाही जेतेपदाची कमाई करता आली नाही. अख्ख्या वर्षांत जेतेपदाशिवाय राहण्याची सायनाची कारकिर्दीतील पहिली वेळ आहे. वारंवार झालेल्या स्पर्धामुळे सायनाने यंदाच्या वर्षांतल्या पहिल्या अर्थात कोरिया सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेतून माघार घेतली होती. विश्रांतीनंतर तंदुरुस्त सायना नव्या वर्षांत गेल्यावर्षीच्या कटू आठवणी बाजूला सारत नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याची सायनाला संधी आहे.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झालेल्या सायनाची सलामीची लढत इंडोनेशियाच्या हेरा देसीशी होणार आहे. मात्र प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार करत अंतिम फेरीपर्यंत कूच करणे सोपे असणार नाही कारण सायनाच्या गटातच लि झेरुई आणि यिहान वांग या मातब्बर खेळाडू आहेत. गेल्या दोन वर्षांत सायनाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. ही कामगिरी सुधारण्याचीही तिला संधी आहे. सलामीची लढत जिंकल्यास दुसऱ्या फेरीत सायनासमोर जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानी असलेल्या याओ झ्युशी होणार आहे. राष्ट्रीय विजेती पी.व्ही.सिंधू गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
 सिंधूनेही कोरिया सुपर सीरिज स्पर्धेतून माघार घेतली होती. यंदाच्या वर्षांतील पहिल्या स्पर्धेत आपला ठसा उमटवण्यासाठी सिंधू आतुर आहे. गेल्यावर्षी मलेशिया ग्रां.प्रि. आणि मकाऊ येथे झालेल्या स्पर्धेत सिंधूने जेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या सिंधूला चांगली कामगिरी करत क्रमवारीत अव्वल दहामध्ये धडक मारण्याची संधी आहे. सिंधूची पहिली लढत इंडोनेशियाच्या लिंडावेनी फॅनेट्रीशी होणार आहे. पुरुष गटात पारुपल्ली कश्यपचा मुकाबला जर्मनीच्या मार्क झ्वालबरशी होणार आहे. राष्ट्रीय विजेता कदंबी श्रीकांत सलामीच्या लढतीत हाँगकाँगच्या युन ह्य़ूचा सामना करणार आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्त, आनंद पवार हे भारतीयही रिंगणात आहेत.