पाटणा-बिहार येथे सुरू असलेल्या ६१व्या अव्वल पुरुष/महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणा, पंजाब, कर्नाटक, रेल्वे या महिलांच्या संघांनी; तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, चंडीगढ, राजस्थान या संघांनी पुरुष गटात पहिल्या विजयाची नोंद केली. ‘ड’ गटात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. महाराष्ट्राच्या महिला संघाने सलग दुसरा विजय नोंदवीत बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
पाटणा, बिहार येथील पाटीलपुत्र बंदिस्त क्रीडा संकुलात मॅटवर झालेल्या ‘अ’ गटात महाराष्ट्राने तामिळनाडूला ४३-३५ असे रोखत साखळीतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे यांच्या दमदार चढाया आणि त्यांना स्नेहल साळुंखेची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे मध्यंतराला ३०-१३ अशी मोठी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मात्र तामिळनाडूने आक्रमक पवित्रा घेत जोरदार प्रत्युत्तर करत महाराष्ट्राच्या गोटातून २२ गुणांची कमाई केली. याच काळात महाराष्ट्राला मात्र १३ गुणच मिळवता आले. परंतु मध्यंतरातील आघाडीमुळे महाराष्ट्राने आठ गुणांनी विजय मिळविला.
महिलांच्या ‘क’ गटात हरियाणाने विदर्भाला २९-११ असे पराभूत केले. याच गटात मणिपूरने पुदुच्चेरीला ३७-२१ असे पराभूत केले. ‘ब’ गटात पंजाबने बिहारला ३७-११ असे हरवले. भारतीय रेल्वेने छत्तीसगडला ४३-१२ असे नमविले. ‘अ’ गटात तामिळनाडूला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. हिमाचल प्रदेशने त्यांना ४६-३४ असे पराभूत केले. तामिळनाडूच्या सलग दुसऱ्या पराभवामुळे बाद फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ‘ड’ गटात मात्र दोन्ही सामन्यांत बरोबरी झाली. कर्नाटकने दिल्लीला ३३-३३ असे, तर आंध्र प्रदेशने मध्य प्रदेशला ३५-३५ असे बरोबरीत रोखले.