आठवडय़ाची मुलाखत – उदय देशपांडे, मल्लखांब प्रशिक्षक

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : मल्लखांब खेळाचा खेलो इंडिया स्पर्धेत समावेश केल्यामुळे माझ्यासह तमाम मल्लखांब खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन मिळाले असून आता मल्लखांबला ऑलिम्पिकपर्यंत पोहचवण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मल्लखांबला अधिकृत मान्यता देताना खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश झाल्याचे जाहीर केले. गेल्या काही वर्षांंत मल्लखांबने मोठी भरारी घेतली असून यामध्ये देशपांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. एकंदर मल्लखांबच्या प्रगतीविषयी आणि पुढील योजनांविषयी देशपांडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

’ खेलो इंडिया स्पर्धेत मल्लखांबचा समावेश किती लाभदायक ठरेल?

मल्लखांब खेळाला वर्षांनुवर्षांंचा इतिहास तसेच परंपरा लाभली आहे. जवळपास २०० वर्षांंपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मल्लखांब खेळ पुनरुज्जीवित झाल्याचे समजते. परंतु मल्लखांबला खेळ म्हणून अधिकृत मान्यता मिळण्यासाठी १९९६ पर्यंतची वाट पाहावी लागली. त्यानंतर २४ वर्षांंनी मल्लखांबचा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत समावेश होणे, ही खरेच सुखावणारी गोष्ट आहे. युवा खेळाडूंमध्ये लहानपणापासूनच याविषयी प्रेम निर्माण झाले, तर भविष्यात हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत नक्कीच पोहचू शकतो, याची मला खात्री आहे.

’ करोनाचा मल्लखांबला कितपत फटका बसला?

निश्चितपणे, अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणे मल्लखांबलादेखील करोनाचा फटका बसला. परंतु तरीही या काळात विविध मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून आम्ही खेळाडूंना खेळाशी निगडित ठेवले. खेळाडूंची ऑनलाइन मार्गदर्शकांची चर्चा घडवणे, त्यांच्या मानसिक तंदुरुस्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, यावरही आम्ही भर दिला.

’ मल्लखांब खेळाच्या सद्यस्थितीबद्दल तुमचे काय मत आहे? मल्लखांबच्या सरावाला प्रारंभ झाला आहे का?

निवडक खेळाडूंच्या उपस्थितीत मल्लखांबच्या सरावाला प्रारंभ झाला असून खेळाडू करोनामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचेसुद्धा खेळाडू भान राखत आहेत. गतवर्षी प्रथमच मल्लखांबचा विश्वचषक खेळवण्यात आला आणि यामध्ये जगभरातून खेळाडू आले होते. त्यामुळे पुढील वर्षीसुद्धा अमेरिकेत विश्वचषकाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू केले आहेत.

’ मल्लखांबविषयी युवा पिढीचा दृष्टिकोन कसा आहे?

शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मल्लखांबचा समावेश केल्याने युवा खेळाडू मोठय़ा प्रमाणावर या खेळाकडे वळत आहेत. किशोरवयीन गटातच मुलांच्या शरीराला मल्लखांबची सवय लागली तर ते नक्कीच यामध्ये कारकीर्द घडवू शकतात. मल्लखांबद्वारे खेळाडूंना आता नोकरीतसुद्धा आरक्षण मिळू लागले आहे. युवापासून त् ज्येष्ठांपर्यंत सगळेच या खेळात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे मल्लखांबचे भविष्य उज्ज्वल आहे.

’ येत्या काळात मल्लखांबचा अधिक प्रचार—प्रसार करण्यासाठी काही योजना आखल्या आहेत का?

येत्या काळात मल्लखाबांच्याही परीक्षा आयोजित करून खेळाडूंना अधिक परिपक्व करण्याचे आमचे ध्येय आहे. राष्ट्रीय स्पर्धामध्ये मल्लखांबाचा समावेश झाल्याने मल्लखांब आता युवा पिढीत लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काळातही मल्लखांबच्या अधिकाधिक स्पर्धा आम्ही आयोजित करण्यावर भर देऊ.