News Flash

पोल मल्लखांबमध्ये पराभूत भारतासाठी धोक्याची घंटा!

मुलींचा मल्लखांब म्हटला की गेल्या वर्षीपर्यंत रोप म्हणजेच दोरीचा मल्लखांबच मानला जायचा.

|| धनंजय रिसोडकर

मुलींच्या पोल मल्लखांब प्रकारात भारतीय कन्यांना पिछाडीवर टाकत जपानच्या केकोने सुवर्ण तर इटलीच्या डेलियाने रौप्यपदक पटकावले. त्यामुळे भारताच्या हिमानी परबला कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. पोल मल्लखांबमध्ये भारतीय मुलींनी सराव करण्यास प्रारंभ करून दोन महिनेसुद्धा झालेले नाहीत, हे त्यामागील वास्तव आहे. त्यामुळे पहिल्याच जागतिक मल्लखांब स्पर्धेतील हा निकाल भारतासाठी धोक्याची घंटाच आहे.

मुलींचा मल्लखांब म्हटला की गेल्या वर्षीपर्यंत रोप म्हणजेच दोरीचा मल्लखांबच मानला जायचा. मात्र आता नवीन नियमांनुसार मुले आणि मुली दोघांनाही पोल मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब यावरील प्रदर्शन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे केवळ दोरीच्या मल्लखांबवर सराव करणाऱ्या भारतीय मुली अवघ्या दीड-दोन महिन्यांपासून पोल मल्लखांबवर सराव करू लागल्या. मात्र मल्लखांबच्या या प्रकारात कौशल्याबरोबरच खांदा आणि मनगटातील ताकदीलादेखील महत्त्व असते. त्यातच भारतीय मुली काहीशा कमी पडल्याने पोल मल्लखांबमध्ये भारताच्या हिमानीला केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

जिम्नॅस्टिक्समध्ये रोमन रिंगमध्ये अधिक प्रमाणात ताकद लागत असल्याने हा प्रकार महिलांसाठी वज्र्य आहे. त्याप्रमाणेच महिलांसाठी पोल मल्लखांबदेखील वज्र्य असावा, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे पोल मल्लखांबवर अधिकाधिक सराव हेच लक्ष्य महिला मल्लखांबपटूंना ठेवावे लागणार आहे. मल्लखांबचा जगात अद्यापही तितकासा गवगवा झालेला नसताना आणि सर्व प्रकारच्या कसरतींचे खेळ खेळणाऱ्या मुलींपर्यंत मल्लखांब पोहोचलेला नसूनदेखील पहिल्याच जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारताला बसलेला फटका हा पुढील परिणामांचे संकेत दर्शवणारा आहे.

किको पोल डान्सर, तर डेलिया सर्कसपटू

पोल मल्लखांबमध्ये पहिला क्रमांक पटकावलेली जपानी किको ही अ‍ॅक्रोबॅटीक पोल डान्सर आहे. ती गेल्या दशकभरापासून अ‍ॅक्रोबॅटीक पोल डान्सचा सराव करते. तिने सहा वर्षांपूर्वी विलेपार्लेच्या पार्लेश्वर व्यायामशाळेत मल्लखांबचे प्राथमिक धडे गिरवले आणि त्यानंतर गत महिनाभरापासून मल्लखांबचा सराव करीत होती, तर इटलीची डेलिया ट्रेपिझवर काम करणारी सर्कसपटू असल्याने विविध प्रकारच्या कसरती करण्याच्या सरावाचा तिला फायदा झाला. या अनुभवावर व शारीरिक ताकदीच्या बळावर त्या दोघींनी पोल मल्लखांबवरील क्लृप्ती झटकन आत्मसात करीत भारतीय मुलींना पोल मल्लखांबमध्ये धोबीपछाड दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:13 am

Web Title: mallakhamb world championship 2019
Next Stories
1 शाळा-महाविद्यालयांत वर्षांतून एकदाच क्रीडादिवस का?
2 ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीनेच सराव सुरू!
3 पुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी मला सोशल मीडियाची गरज नाही, ट्रोलर्सना सानिया मिर्झाने सुनावलं
Just Now!
X