18 October 2018

News Flash

अमेरिकेतही मल्लखांब रुजतोय!

अमेरिकन मल्लखांब महासंघाची स्थापना 

मल्लखांबाविषयी तांत्रिक मार्गदर्शन करताना चिन्मय व प्रज्ञा पाटणकर.

मल्लखांब खेळामुळेच आपल्याला लोकप्रियता मिळाली आहे. त्याचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ही भावना लक्षात ठेवत चिन्मय व प्रज्ञा पाटणकर या दाम्पत्याने अमेरिकेत मल्लखांबाचा प्रसार करण्याचे व्रत अंगीकारले आहे व त्यांच्या प्रयत्नात अनेकांची साथ मिळाल्यामुळे हा खेळ तिथेही रुजत आहे.

चिन्मयने शालेय व खुल्या गटात राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली. त्याला राज्य शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्याची पत्नी प्रज्ञानेदेखील राज्यस्तरावरील मल्लखांब स्पर्धामध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. या खेळासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे सतत त्यांच्या मनात येत असे. मात्र चिन्मयच्या फिरतीच्या नोकरीमुळे त्याला हे ध्येय साध्य करता येत नव्हते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये दहा वर्षे नोकरी करण्याचा त्याचा निश्चय झाला. तेव्हा त्याने या खेळाचा प्रसार करण्याचेही ठरवले. सुदैवाने प्रज्ञासारख्या जोडीदाराचीही त्याला सतत साथ मिळाली.

चिन्मय व प्रज्ञा यांनी २०१२ मध्ये एडिसन येथे स्वत:च्या घरातील गॅरेजमध्ये मल्लखांब खेळाच्या प्रशिक्षणाचा वर्ग सुरू केला. साधारणपणे ४ ते १४ वर्षे मुला-मुलींकरिता हा वर्ग नि:शुल्क घेण्याचे ठरवले. त्यांच्या या वर्गाला न्यूयॉर्कमधील भारतीय मुलामुलींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लहान मुलामुलींप्रमाणेच काही पालकांनीही त्यामध्ये प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला. प्रत्येक शनिवार व रविवारी हे वर्ग चालवले जातात. ५० प्रशिक्षणार्थी त्याचा लाभ घेतात. या वर्गाला वाढता प्रतिसाद मिळू लागल्यानंतर आपल्यामुळे परिसरातील अन्य लोकांना या वर्गाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी एका सभागृहात हा वर्ग सुरू केला.

या खेळाच्या प्रसारात सगळ्यात मोठी अडचण असते मल्लखांबाची. मल्लखांबासाठी आवश्यक असणारे लाकूड अमेरिकेत उपलब्ध नाही. त्यामुळे मल्लखांब भारतामधून आयात करावा लागतो. त्याची किंमत २५ हजार रुपये असते, परंतु आयात करण्याचा खर्च दीड दोन लाख रुपये. सुरुवातीला मल्लखांबाचा प्रसार करणाऱ्यांनी पदरमोड करीत ही जबाबदारी स्वीकारली. अलीकडेच केदार सदावर्ते या भारतामधील उद्योजकाने भारतामधून अमेरिकेत मल्लखांब मोफत पाठवण्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे काम हलके झाले आहे.

अमेरिकन मल्लखांब महासंघाची स्थापना 

कोणत्याही खेळाला संघटनात्मक पाया नसेल तर त्याचा प्रसार होण्यात अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊनच पाटणकर दाम्पत्यांने २०१५ मध्ये राजेश नारखेडे, मनाली भोळे, इंद्रनील सोपरकर, ओंकार देशपांडे यांच्या सहकार्याने अमेरिकन मल्लखांब महासंघाची स्थापना केली. त्याचे सर्व कामकाज पाटणकरांच्या घरातूनच चालते. त्यांना या महासंघासाठी किरीट ठाकरे, मंजुनाथ नेरनेकी, श्रेयस दारिपकर, विकास संगम, महेश वाणी यांचे सहकार्य लाभले आहे. पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून राहुल जोशी व प्रभाकर नागिरेड्डी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२० पर्यंत अमेरिकेतील प्रत्येक राज्यात एक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

संयुक्त राष्ट्र संघातही प्रात्यक्षिके

मल्लखांब खेळाच्या इतिहासात प्रथमच या खेळाची प्रात्यक्षिके संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य कार्यालयात सादर करण्यात आली. दोरीचा मल्लखांब व पुरलेल्या मल्लखांबावर वैयक्तिक व सांघिक पिरॅमिड्सना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी भारतीय राजदूत सईद अकबरुद्दीन उपस्थित होते. त्यांनी अमेरिकेत या खेळाचा प्रसार करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

खेळाची कक्षा रुंदावत आहे

अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये हळूहळू या खेळाचा प्रसार होत आह. मिशिगन येथे अमित यादव, सिद्धार्थ वायचळ, रुची चोक्सी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र सुरू झाले तर कॅलिफोर्निया परिसरात रुबी कॅरेन व ल्युका सेचिनी यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. इंडोनेशियाच्या रुबी यांनी खेळाचे प्रशिक्षण उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे, तर प्रशिक्षक म्हणून आवश्यक असणारे ज्ञान त्यांनी पाटणकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. अलीकडेच बोस्टन येथेही प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये अमेरिकत मल्लखांब करणाऱ्यांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे. लवकरच पेनसिल्वानिया, कनेक्टिकट, मॅसेच्युसेट्स व नॉर्थ कॅरोलिना भागातही प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे.

तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण अभ्यासक्रम

अमेरिकेत हा खेळ रुजवायचा असेल तर तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण अभ्यासक्रम आखला पाहिजे या हेतूने पाटणकरांनी वेगवेगळ्या श्रेणीचे अभ्यासक्रम तयार केले असून त्याद्वारे तिथे शिकवले जात आहे. पाटणकरांची मुलगी अमेरिकेत जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असते. तेथील प्रशिक्षक मुलामुलींना विविध कसरती करताना हात देत नाहीत. कोणताही आधार न घेता या मुलामुलींनी कसरती केल्या तर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असा त्यामागे हेतू असतो. हे लक्षात आल्यानंतर चिन्मय यानेही मल्लखांब वर्गात तसाच प्रयोग सुरू केला आहे.

 

First Published on December 8, 2017 3:29 am

Web Title: mallakhamba sport in united states of america