ममता देवी आणि बोरुन यमनम यांच्या भावना

‘‘आतापर्यंत मी बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळले. भारतात खऱ्या अर्थाने महिला शरीरसौष्ठवाची मी सुरुवात केली, पण महिलांना या स्पर्धेसाठी अजूनही चांगला प्रतिसाद मिळत नाही. शरीरसौष्ठवाकडे एका खेळाच्या नजरेतून लोकांनी पाहायला हवे, तरच भारतात महिला शरीरसौष्ठवपटूंची संख्या वाढेल,’’ अशी भावना आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू ममता देवीने व्यक्त केली.

‘तळवलकर क्लासिक’ स्पर्धेतील मिश्र जोडी विभागात ममता आणि तिचे पती बोरून यमनम यांनी सहभाग घेतला होता. भारतामध्ये एखाद्या शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले. या दोघांना पाहूनच ही संकल्पना भारतामध्ये प्रत्यक्षात उतरली. हे दोघेही मणिपूरचे असून सध्या ते दिल्लीमध्ये एकत्रित सराव करतात.

‘‘माझ्या घरामध्ये सारेच खेळाडू आहेत. माझे बाबा, भाऊ यांनी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. मिश्र दुहेरी स्पर्धेत उतरणारे आम्ही पहिले दाम्पत्य आहोत. प्रत्येक दाम्पत्याने तंदुरुस्त राहायला हवे. या स्पर्धेत यापुढे अनेक दाम्पत्यांनी सहभाग घ्यायला हवा, हे या वेळी मी आवाहन करू इच्छितो. महिला शरीरसौष्ठवपटूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलायला हवा,’’ असे बोरून म्हणाला.

शरीरसौष्ठवातील कारकीर्दीविषयी ममता म्हणाली की, ‘‘मी माझा पती बोरूनला पाहूनच शरीरसौष्ठवाकडे वळले. त्याच्याकडून मी शिकले आणि त्याच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. २०१२ साली आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी मी पहिली भारतीय महिला ठरले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता चांगला मानसन्मान मिळतो, पण भारतामधील हे चित्र बदलायला हवे. सध्या हे चित्र थोडे बदलत आहे, पण महिलांना चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यांचा स्पर्धात्मक स्तर नक्कीच उंचावेल आणि भारतीय महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा फडकावल्याशिवाय राहणार नाहीत.’’

मुलांना चांगले शिक्षण देणार

‘‘आम्ही दोघेही शरीरसौष्ठव या खेळात असलो तरी आमच्या मुलांना मात्र खेळामध्ये आणण्याचा माझा विचार नाही. माझ्या मते त्यांनी भरपूर शिक्षण घ्यायला हवे. मोठी मुलगी उत्तम तायक्वांदो आणि मार्शल आर्ट्स खेळते. पण दुसरी मुलगी आणि लहान मुलगा यांना मात्र मी चांगले शिक्षण कसे मिळेल, हेच पाहते. कारण शिक्षणाशिवाय तुमच्या आयुष्याला अर्थ नसतो. त्यामुळे त्यांनी आधी चांगले शिक्षण घ्यावे आणि त्याबरोबर आपल्या कारकीर्दीचा विचार करावा,’’ असे ममता देवीने सांगितले.