17 October 2019

News Flash

क्रिकेट सामन्यावरून राडा; गोळी झाडून एकाची हत्या

वाद सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला...

क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकते. क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. काही वेळा मैदानात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये वाद होतात, तर काही वेळा एखादा खेळाडू थेट अंपारशीच वाद घालतो. असे अनेक चित्रविचित्र किस्से क्रिकेटच्या मैदानावर घडत असतात. मात्र नुकताच क्रिकेटच्या मैदानावरील एका राड्यामुळे चक्क एकाची हत्या झाल्याची घटना घडली.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. भिंड जिल्ह्यातील कोट या गावात क्रिकेट सामन्यात झालेल्या वादावरून एका ३० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी या बाबतची माहिती दिली असून या संदर्भात ५ जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. आनंद (४०), रामहेत (६०), राघवेंद्र (२८), अभिषेक (१७) आणि अविनेष (२३) अशी या पाच जणांची नावे आहेत.

दुर्दैवी! सामना सुरू असताना मैदानावरच पंचांचा मृत्यू

“आनंदने ३० वर्षीय ब्रिजेंद्र याला त्याच्याकडे परवाना असलेल्या बंदुकीने गोळी झाडून ठार मारले. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ३० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या नायगांव परिसरात एक क्रिकेट सामना खेळण्यात आल्या. या सामन्यात काही वादावादी झाली. ही वादावादी मैदानावर संपली नाही. त्यामुळे ब्रिजेंद्र आणि त्याचे मित्र आनंदच्या घरी वाद मिटवायला आला. पण वाद मिटण्याऐवजी विकोपाला गेला अन् रागाच्या भरात आनंदने ब्रिजेंद्रवर गोळी झाडून त्याला ठार मारले”, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बुधवारी ब्रिजेंद्र त्याच्या मित्रांना घेऊन आनंदच्या घरी आला होता. त्यावेळी मैदानावर झालेला वाद मिटवणे हा त्या मागचा उद्देश होता. पण दोन गटांमध्ये या भेटीदरम्यान पुन्हा वादाची ठिणगी पडली. त्यावेळी आनंदने ब्रिजेंद्रला त्याच्या मित्रांसमोरच गोळी झाडून ठार केले. त्यानंतर आनंद तेथून पसार झाला. अद्यापही आनंद फरार आहे, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रिजेंद्रच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

First Published on October 10, 2019 7:01 pm

Web Title: man allegedly shot dead after argument over cricket match in madhya pradesh bhind district 5 suspect booked vjb 91