इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू वेन रूनी याने झळकावलेल्या या मोसमातील सर्वोत्तम गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत वेस्ट हॅम युनायटेडचा २-० असा पराभव करून आठवडय़ाचा शेवट गोड केला. लिव्हरपूलने कार्डिफ सिटीचा ६-३ असा धुव्वा उडवत गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. मँचेस्टर सिटीने फुलहॅमचा ५-० असा दणदणीत पराभव करून तिसऱ्या स्थानावरील मक्तेदारी कायम राखली आहे.
आठव्या मिनिटालाच गोल करून रूनीने मँचेस्टर युनायटेडचे खाते खोलले. त्यानंतर ३३व्या मिनिटाला गोल करून त्याने युनायटेडला २-० असे आघाडीवर आणले. हीच आघाडी युनायटेडला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली. लिव्हरपूलने लुइस सुआरेझच्या हॅट्ट्रिकमुळे कार्डिफवर ६-३ असा विजय मिळवला. सुआरेझने १६व्या, ६०व्या आणि ९०व्या मिनिटाला गोल केले. त्याला मार्टिन स्कर्टलने (४१व्या आणि ५४व्या मिनिटाला) दोन गोल करत चांगली साथ दिली. डॅनियल स्टरिजनेही ७५व्या मिनिटाला गोल झळकावत विजयात योगदान दिले. याया टौरेने साजऱ्या केलेल्या हॅट्ट्रिकमुळे (२६व्या, ५४व्या आणि ६५व्या मिनिटाला) मँचेस्टर सिटीने फुलहॅमवर ५-० असा सहज विजय साकारला. फर्नाडिन्हो आणि मार्टिन डेमिचेलिस  यांनीही गोल झळकावत सिटीला विजय मिळवून दिला.