News Flash

मँचेस्टर सिटीचा पिछाडीनंतर विजय

पहिल्या टप्प्यातील उपांत्य लढतीत पॅरिस सेंट-जर्मेनवर २-१ अशी मात

(संग्रहित छायाचित्र)

चॅम्पियन्स लीग फुटबॉल

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीने बुधवारी मध्यरात्री झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्याच्या लढतीत पॅरिस सेंट-जर्मेनवर पिछाडीवरून सरशी साधून २-१ अशी मात केली. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर दोन गोल केल्यामुळे आता पुढील आठवड्यात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीपूर्वी मँचेस्टर सिटीने महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.

पॅरिसमधील पर्स-दि-प्रिन्सेस स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मार्किन्होसने १५व्या मिनिटाला यजमानांसाठी पहिला गोल केला. मध्यांतरापर्यंत सेंट-जर्मेन ही आघाडी टिकवण्यात यशस्वी ठरले. परंतु झोकात पुनरागमनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिटीने यंदाही तोच कित्ता गिरवला. कर्णधार केव्हिन डीब्रुएने याने ६४व्या मिनिटाला गोलरक्षक किलर नवासला चकवून पहिला गोल नोंदवत सिटीला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ७१व्या मिनिटाला रियाद मेहरेझने फ्री  किकद्वारे अप्रतिम गोल साकारून सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आता ५ मे रोजी सिटी घरच्या मैदानावर उपांत्य फेरीतील दुसरी लढत खेळेल, तर ६ मे रोजी रेयाल माद्रिद आणि चेल्सी यांच्यातील सामना होईल. रेयाल आणि चेल्सी यांच्यातील पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.

१८ मँचेस्टर सिटीने विविध स्पर्धांमधील प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील गेल्या सलग १८ सामन्यांत विजय मिळवला आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये त्यांना मँचेस्टर युनायटेडविरुद्ध अखेरचा पराभव पत्करावा लागला.

९ मँचेस्टर सिटीने चॅम्पियन्स लीगमधील मागील आठ सामन्यांत नोंदवलेल्या नऊ गोलमध्ये केव्हिन डीब्रुएनेचा हातभार आहे. यापैकी पाच गोल त्याने स्वत: झळकावले आहेत, तर अन्य चारसाठी गोलसाहाय्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:37 am

Web Title: manchester city beat paris saint germain 2 1 in the semi final abn 97
Next Stories
1 VIDEO : ६ चौकार खाल्ल्यानंतर KKRच्या शिवम मावीने धरली पृथ्वीची मान!
2 DC vs KKR : पृथ्वी शॉच्या वादळापुढे कोलकाता बेचिराख!
3 ४,४,४,४,४,४..! पहिल्याच षटकात पृथ्वी शॉचा मोठा कारनामा
Just Now!
X