इंग्लिश प्रीमियर लीगचा विद्यमान विजेता आणि जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब अशी ओळख असलेल्या मँचेस्टर सिटीवर युरोपियन फुटबॉलमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) केलेल्या या कारवाईमुळे आता मँचेस्टर सिटीला युरोपमधील कोणत्याही स्पर्धामध्ये पुढील दोन वर्षे खेळता येणार नाही. मात्र मँचेस्टर सिटीने या बंदीविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

मँचेस्टर सिटीला दोन वर्षे बंदी तसेच तीन कोटी युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या बंदीविरोधात लवकरात लवकर क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचे मँचेस्टर सिटीने ठरवले आहे. ‘‘शुक्रवारी रात्री ‘यूएफा’च्या न्यायालयीन कक्षाने सुनावलेल्या या निर्णयामुळे आम्ही चकित झालो नसलो तरी निराश मात्र नक्कीच झालो आहोत. या प्रकरणाच्या चौकशीची गुप्तता बाळगण्यात ‘यूएफा’ला अपयश येत होते, त्यामुळेच या निकालाबाबत शंका येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ‘यूएफा’च्या आधिपत्याखाली करण्यात आली. सुनावणीही ‘यूएफा’नेच केली आणि निकालही त्यांनीच सुनावला. आता न्यायालयीन कक्षाने निकाल दिल्यामुळे आम्ही त्याविरोधात दाद मागणार आहोत,’’ असे मँचेस्टर सिटी क्लबकडून स्पष्ट करण्यात आले.

मँचेस्टर सिटीने अनेक नियमांचे उल्लंघन केले असून त्यात क्लब परवाना तसेच आर्थिक खेळभावना नियमांचा समावेश आहे. मँचेस्टर सिटीने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांनाही सहकार्य केले नाही, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. या बंदीच्या कारवाईमुळे यंदा त्यांच्या चॅम्पियन्स लीगमधील सहभागावर टाच येणार नाही. पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीचा चॅम्पियन्स लीगमधील उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना रेयाल माद्रिदशी होणार आहे.

शेख मन्सूर बिन झायेद अल-नहयान यांचा भक्कम पाठिंबा असलेला मँचेस्टर सिटी हा जगातील सर्वोत्तम क्लबपैकी एक आहे. शेख मन्सूर यांनी प्रशिक्षक, खेळाडू, सोयीसुविधा आणि संघाची कार्यपद्धती यामध्ये बरीच गुंतवणूक केली आहे.