दुबळ्या क्रिस्टल पॅलेस संघाकडून २-१ अशी पराभवाची नामुष्की पदरी पडल्यावर इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद कायम राखण्याचा मँचेस्टर युनायटेडचा मार्ग आणखी खडतर झाला.
क्रिस्टल पॅलेसने या विजयाबरोबर गतविजेत्या सिटीला गुणतालिकेतील अव्वल चेल्सी संघापासून ९ गुणांनी पिछाडीवर टाकले. मॅन्युएल पेलेग्रिनी यांच्या संघाला पूर्वार्धात ग्लेन मरेने गोल करून जबरदस्त धक्का दिला. मध्यंतरानंतर जेसन पुंचिऑनने ‘फ्री किक’वर अप्रतिम गोल करून क्रिस्टल पॅलेसला भक्कम आघाडी मिळवून दिली. याया टोरेने केलेला एकमेव गोल ही सिटीलासाठी दिलासादायक बाब.
 प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील सिटीचा हा सलग तिसरा पराभव असून गेल्या सात लढतींत त्यांना पाच पराभवांना सामोरे जावे लागले आहे. सिटीच्या ढिसाळ बचावाचा फायदा उचलत क्रिस्टलने ३४व्या मिनिटाला पहिला गोल नोंदविला. सिटीच्या खेळाडूंना एकामागोमाग चकवत मरेने चेंडू पेनल्टी क्षेत्रात नेत अगदी सहज गोल केला. क्रिस्टलने मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी कायम राखली.
मध्यंतरानंतर अवघ्या ३ मिनिटांत आणखी एक गोल करून क्रिस्टलने सामन्यावर पकड घेतली. मिळालेल्या फ्री किकवर पुंचिऑन याने सिटीची बचावफळीची भिंत भेदून अप्रतिम गोल केला.    ७८व्या मिनिटाला याया टोरे याच्या गोलने सिटीला थोडासा दिलासा दिला खरा, परंतु त्यांना अखेपर्यंत त्यावरच समाधान मानावे लागले.