06 August 2020

News Flash

मँचेस्टर सिटीचा विजेतेपदावर कब्जा!

२००९ मध्ये मँचेस्टर युनायटेडनंतर सलग दोन विजेतेपद पटकावणारा मँचेस्टर सिटी हा एकमेव संघ ठरला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग

ब्रायटनवर ४-१ अशा विजयासह सलग दुसऱ्यांदा वर्चस्व; लिव्हरपूलला द्वितीय स्थानी

मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात इंग्लिश प्रीमिअर लीगच्या विजेतेपदासाठी सुरू असलेली कडवी चुरस अखेर रविवारी संपली. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतर मँचेस्टर सिटीने अ‍ॅमेक्स स्टेडियमवर रंगलेल्या अखेरच्या सामन्यात ४-१ असा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगच्या विजेतेपदावर कब्जा केला.

रविवारच्या सामन्याआधी मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात फक्त एका गुणाचा फरक होता. पेप गार्डिओला यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीने ब्रायटनवर विजय मिळवल्यानंतर लिव्हरपूल आणि वुल्व्हस यांच्यातील सामन्याला महत्त्वच उरले नाही. ग्लेन मरे याने ब्रायटनला २५व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिल्यानंतर सर्जियो अ‍ॅग्युरो, अयमेरिक लॅपोर्टे, रियाद महरेझ आणि इकाय गुंडोजेन यांनी प्रत्येकी एक गोल करत मँचेस्टर सिटीच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

मँचेस्टर सिटीने ९८ गुणांची कमाई करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. २००९ मध्ये मँचेस्टर युनायटेडनंतर सलग दोन विजेतेपद पटकावणारा मँचेस्टर सिटी हा एकमेव संघ ठरला आहे. लीगच्या अखेरच्या टप्प्यात सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात कडवी चुरस रंगली होती. २९ जानेवारी रोजी न्यूकॅसलविरुद्ध गुण गमावल्यानंतर सिटीने सलग १४ सामने जिंकून जेतेपद पटकावले. वुल्व्हसवर ०-२ असा विजय मिळवणाऱ्या लिव्हरपूलला मात्र ९७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

गेल्या १० मोसमांत प्रशिक्षक म्हणून गार्डिओला यांचे हे आठवे विजेतेपद ठरले. ‘‘हे विजेतेपद पटकावण्यासाठी आम्हाला सलग १४ सामन्यांत विजय मिळवावा लागला. माझ्या कारकीर्दीतील हे सर्वात खडतर असे विजेतेपद ठरले. मात्र आम्हाला तोडीस तोड टक्कर देणाऱ्या लिव्हरपूललाही आमच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल. गेल्या मोसमात मँचेस्टर सिटीने आपली कामगिरी उंचावत नवा मापदंड प्रस्थापित केला होता. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न आम्ही केला,’’ असे गार्डिओला यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 1:43 am

Web Title: manchester city occupy the winner
Next Stories
1 IPL 2019: पुणेरी ढोलच्या तालात मुंबई इंडियन्सची जंगी मिरवणूक, चाहत्यांची तुफान गर्दी
2 IPL 2019: पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार का ? धोनी म्हणतो…
3 IPL 2019: याआधी धोनीला कधीच इतकं उदास पाहिलं नव्हतं – संजय मांजरेकर
Just Now!
X