इंग्लिश प्रीमियर लीगचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवलेल्या क्लबवर आर्थिक गैरव्यवहारामुळे कारवाईची शक्यता

काही दिवसांपूर्वीच इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणाऱ्या मँचेस्टर सिटीचे चॅम्पियन्स लीगच्या नव्या हंगामात सहभागी होण्याचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. मँचेस्टर सिटीने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे ‘युएफा’च्या चौकशी समितीकडून त्यांच्यावर एका हंगामाच्या बंदीची मागणी करण्यात आली आहे.

जर्मनीमधील ‘डेल स्पाइजेल’ या मासिकाने हा खुलासा केला असून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. युरोपियन फुटबॉल संघटना आणि प्रीमियर लीगच्या आयोजकांनी या सदंर्भात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी पावले उचलली आहेत. बेल्जियमचे माजी पंतप्रधान येव्स लेटर्मी यांच्या अध्यक्षतेखाली संशोधन चमू त्यांचे कार्य करणार आहे.

मँचेस्टरने आर्थिक आदर्श नियमांनुसार प्रायोजक व्यवहारात ‘युएफा’ला पूर्वकल्पना न देता लाखो रुपयांची वाढ केली असल्याचे मासिकात नमूद करण्यात आले. यापूर्वी २०१४ मध्येसुद्धा नियमभंग केल्यामुळे त्यांना चार कोटी, ९० लाख पौंड रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

जर चॅम्पियन्स लीगच्या या हंगामापूर्वी चौकशी समितीला पुरावे गोळा करण्यास वेळ लागला आणि स्पर्धेच्या सुरुवातीनंतर त्यांनी मँचेस्टरवरील नियमभंगाचे आरोप सिद्ध केल्यास २०२०-२१ या हंगामासाठी मँचेस्टरला चॅम्पियन्स लीगला मुकावे लागेल, असे चौकशी समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, याविरुद्ध मँचेस्टरला क्रीडा लवाद अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची मुभा आहे. परंतु मँचेस्टर सिटीचे नाव बदनाम करण्यासाठी हा सापळा रचला आहे, असे क्लबच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.