भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खोडकळपणाने भारताने माघार घेतल्याचा दावा केला होता. अधिकृत माहिती देताना भारताने सामना forfeit केला म्हणजेच माघार घेतली असं आधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं होतं. मात्र काही वेळातच त्यात बदल करण्यात आला आणि माघार घेतली हा शब्द करुन टाकण्यात आला. असं असलं तरी या पत्रकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यावरुन नाराजी व्यक्त केलीय.

बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय. भारतीय संघामधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलंय. भारतीय संघ मैदानामध्ये उतरु शकत नाही असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे. तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असं असतानाही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताने माघार घेतल्याचा उल्लेख अधिकृत माहितीमध्ये केलेला. मात्र नंतर तो उल्लेख काढून टाकण्यात आला. ईसीबीचं सुधारित पत्रक पाहुयात…

आता ईसीबीने आधी पोस्ट केलेल्या पत्रात काय म्हटलेलं पाहुयात…

Forfeit चा अर्थ काय?

या शब्दाचा अर्थ गमावणे किंवा एखाद्या गुन्‍ह्याबद्दल दंड म्हणून भरावी लागलेली गोष्ट असा होतो. म्हणजेच भारतीय संघामध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांनी या सामन्यामधून माघात घेत इंग्लंडला विजय बहाल केल्याचे संकेत ईसीबीला या एका शब्दामधून द्यायचे होते. मात्र नंतर हा शब्दच काढून टाकण्यात आल्याने मालिकेतील निर्णयाक सामन्याचं काय होणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या खोडीमुळे भारतीय चाहते चांगलेच संतापलेत. ते ट्विटरवरुन यासंदर्भात व्यक्त होताना दिसत आहे. अनेकांनी विराटचा संघ अशाप्रकारे देशाशीसंबंधित मोठी मालिका इतक्या सहजपणे इंग्लंडच्या हातात देईल असं वाटत नसल्याचं मत व्यक्त केलंय.

निकाल अद्याप नाहीच

विराट असं करणार नाहीच

चाहत्यांमध्येच वाद

असाच सामना देतील का?

काय गोंधळ आहे

इंग्लंडने केलेली सामना बहाल करण्याची मागणी…

संघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) मागणी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने गुरुवारी फेटाळून लावली होती. शास्त्री, अरुण आणि परमार यांना करोनाची लागण झाल्याने भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारताने जोखीम पत्करून कसोटी खेळण्याऐवजी इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी ‘ईसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र रोहित-विराट यांनी त्यांचा डाव उधळून लावला. याशिवाय, २०२२मधील मर्यादित षटकांच्या मालिकेवर याचे विपरित परिणाम होतील, असेही भारतीय संघ व्यवस्थापनाने ‘ईसीबी’ला कळवल्याचे समजते. पाचवी कसोटी रद्द झाली, तर भारत २-१ अशा फरकाने मालिका जिंकेल. मात्र भारताने स्वत:हून पराभव मान्य केल्यास इंग्लंड मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल आणि पतौडी करंडक त्यांच्याकडेच कायम राखला जाईल.