चॅम्पियन्स लीगची पात्रता फेरी हुकली; व्हॅन गाल यांच्या विरोधात घोषणाबाजी
इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेच्या गुणतालिकेत चौथे स्थान पटकावून युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत प्रवेश मिळवण्यात मँचेस्टर युनायटेडला अपयश आले. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळविण्यात आलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात युनायटेडने ३-१ अशा फरकाने बोर्नमाऊथ क्लबचा पराभव केला, परंतु त्यांना अखेरीस पाचव्या स्थानावरच समाधान मानावे लागले. युनायटेडच्या चाहत्यांनी प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांच्याप्रति तिरस्कारदर्शक आवाज काढून नाराजी व्यक्त केली.
नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी होणारा हा सामना बॉम्बच्या अफवेमुळे पुढे ढकलण्यात आला. चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी या कट्टर वैरी संघांमध्ये चुरस होती, परंतु सिटीने अखेरच्या लढतीत स्वानसी सिटीला १-१ असे बरोबरीत रोखून चौथे स्थान पटकावले. युनायटेडला हे स्थान पटकावण्यासाठी बोर्नमाऊथवर १९-० असा अशक्यप्राय विजय मिळवणे गरजेचे होते. हा विजय शक्य नसल्याने युनायटेडने केवळ विजयी निरोप देण्याच्या दृष्टीने खेळ केला.
वेन रुनीने ४३व्या मिनिटाला युनायटेडचे खाते उघडले. त्यात १८ वर्षीय मार्कस रॅशफोर्डने ७४व्या मिनिटाला आणि अ‍ॅशले यंगने ८७ व्या मिनिटाला भर घालून युनायटेडला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. भरपाई वेळेत सी. स्मॉलींगच्या स्वयंगोलमुळे बोर्नमाऊथला एक गोल करता आला. युनायटेडने ३-१ असा विजय मिळवत गुणतालिकेत पाचवे स्थान निश्चित केले. मात्र, या विजयानंतर निराश झालेल्या चाहत्यांनी प्रशिक्षक गाल यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. गाल यांना घरी पाठवा, असे संदेश देणारे फलक प्रेक्षकांच्या हातात पाहायला मिळत होते.
‘मला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यासाठी सर्वाचे आभार,’ असे मत गाल यांनी व्यक्त करून स्टेडियममधून काढता पाय घेतला. या निकालामुळे युनायटेडने युरोपा लीग स्पध्रेतील गट साखळीतील स्थान पक्के केले. तरीही युनायटेडच्या ईपीएलमधील कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी गाल यांच्या हकालपट्टीची मागणीही केली आहे. त्यामुळे आगामी काळात गाल यांची बदली होऊ शकते.

१०० : वेन रुनीने ओल्ड ट्रॅफर्डवर १००व्या ईपीएल गोलची नोंद केली. एका मैदानावर सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आर्सेनलच्या थिएरी हेन्रीच्या नावावर आहे. हायबरी येथे त्याने ११४ गोल केले आहेत.

०५ : मँचेस्टर युनायटेडने ईपीएलच्या हंगामात ४९ गोल केले. ईपीएलच्या इतिहासात युनायटेडला (१९७३, १९७४, १९८९ आणि १९९०) पाचव्यांदा ५० हून कमी गोलवर समाधान मानावे लागले आहे.