मँचेस्टर युनायटेडने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत स्टोक सिटीचा २-० असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र चेल्सी आणि टॉटनहॅम हॉट्सपर या संघांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
वेन रूनीच्या अनुपस्थितीत मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांनी डॅनी वेलबॅक या एकमेव आघाडीवीराला संघात संधी दिली. २८व्या मिनिटाला वेलबॅकच्या पासवर अ‍ॅशले यंगला गोल करण्याची सुरेख संधी होती. पण चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात त्याला अपयश आले. दुसऱ्या सत्रात मोयेस यांनी जेव्हियर हेर्नाडेझला मैदानात पाठवल्यानंतर सामन्याचे चित्रच पालटले. अ‍ॅशले यंगने चेंडू हेर्नाडेझकडे पास केला. त्यानंतर हेर्नाडेझकडे तो पुन्हा सुपूर्द केला. गोलक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवल्यानंतर अ‍ॅशले यंगने मारलेला फटका अडवण्याचा प्रयत्न स्टोक सिटीचा गोलरक्षक थॉमस सोरेन्सेन याने केला. पण चेंडू त्याच्या ग्लोव्हज्ला स्पर्श करून गोलजाळ्यात गेला. ७८व्या मिनिटाला पॅट्रिस एव्हराने दुसरा गोल करत मँचेस्टर युनायटेडला विजय मिळवून दिला.
सोमवारी आंद्रे व्हिला-बोयास यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकल्यानंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या टॉटनहॅमला वेस्ट हॅम युनायटेडकडून १-२ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. अंतरिम प्रशिक्षक टिम शेर्वूड यांनी निवडलेल्या संघावर सर्वानीच आश्चर्य व्यक्त केले. इमान्यूएल अडेबायोरने ६७व्या मिनिटाला टॉटनहॅमसाठी पहिला गोल केला. मात्र त्यानंतर मॅथ्यू जार्विस (८०व्या मिनिटाला) आणि मोदिबो मायगा (८५व्या मिनिटाला) यांनी लागोपाठ दोन गोल करत वेस्ट हॅमला विजय मिळवून दिला. संदरलँडने चेल्सीचे आव्हान २-१ असे परतवून लावले. की संग-यूएंग आणि फॅबियो बोनिनी यांनी गोल करत संदरलँडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.