करोना साथीच्या पार्श्वभूमीवर युरोपातील फुटबॉलला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर मँचेस्टर युनायटेड आणि इंटर मिलान या संघांनी युरोपा लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

मँचेस्टर युनायटेडने लास्क लिंझ या ऑस्ट्रियाच्या क्लबवर दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात २-१ असा विजय मिळवत एकूण ७-१ अशा फरकाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या टप्प्याच्या सामन्यात युनायटेडने ५-० असा विजय मिळवला होता. फिलिप वेसिंगरच्या (५५व्या मि.) गोलमुळे लास्क लिंझने आघाडी घेतली होती; पण दोन मिनिटांनंतर जेस्से लिंगार्डने गोल करत मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ८८व्या मिनिटाला अँथनी मार्शलने गोल करत युनायटेडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्यपूर्व फेरीत मँचेस्टर युनायटेडची गाठ कोपनहेगन संघाशी पडणार आहे. कोपनहेगनने इस्तंबूल बसाकसेहिरला ३-१ असे हरवले.

इंटर मिलानने गेटापेचे आव्हान २-० असे परतवून लावले. रोमेलू लुकाकू  आणि ख्रिस्तियन एरिक्सेनचे गोल मिलानच्या विजयात मोलाचे ठरले.