एफ. ए. फुटबॉल चषक स्पर्धेत विगान विरुद्ध मँचेस्टर सिटीचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाचे पडसाद आता दिसू लागले आहेत. आतापर्यंत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारे व्यवस्थापक रॉबर्ट मॅनसिनी यांना डच्चू देण्याचा निर्णय सिटी व्यवस्थापनाने घेतला आहे. यंदाच्या हंगामासाठी ठरवण्यात आलेली कोणतीही उद्दिष्टे साध्य करण्यात अपयश आल्याने मॅनसिनी यांची पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे मँचेस्टर सिटी व्यवस्थापनाने स्पष्ट केला आहे.
इटलीच्या ४८ वर्षीय मॅनसिनी यांनी २००९ मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली होती. मॅनसिनी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये मँचेस्टर सिटीने गेल्या वर्षी प्रीमिअर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. २०११ मध्ये सिटीने एफ. ए. चषकाच्या जेतेपदावर कब्जा केला होता. या विजयातही मॅनसिनी यांची भूमिका महत्त्वाची होती.
मात्र प्रतिष्ठेच्या इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडने सिटीला मागे टाकत जेतेपद पटकावले. प्रीमिअर लीगसारख्या मानाच्या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडकडून झालेल्या पराभवाने मॅनसिनी यांच्या हकालपट्टीत निर्णायक भूमिका बजावली. गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत एकही गोलविना मँचेस्टर सिटीचे आव्हान संपुष्टात आले होते. या दोन मोठय़ा स्पर्धामध्ये सुमार कामगिरीसह एफ.ए.चषकात विगानकडून पराभूत झाल्याने मॅनसिनी यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तबच झाले.
दरम्यान, हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी मॅनसिनी यांचे साहाय्यक ब्रायन किड मँचेस्टर सिटीचे प्रभारी व्यवस्थापक असणार आहेत. मलागाचे व्यवस्थापक मॅन्युल पेलेग्रिनी यांच्याकडे सिटीच्या व्यवस्थापकपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.