|| तुषार वैती

मंदार राव देसाई मुंबई सिटी एफसीचा फुटबॉलपटू

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबई सिटी एफसीला चांगली कामगिरी करूनही इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे. यंदा मुंबई सिटी एफसीने विजयी घोडदौड कायम राखत आपला दबदबा निर्माण केला आहे. आतापर्यंत स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यामुळे मुंबई सिटी एफसी जेतेपदावर नक्कीच नाव कोरेल, असा विश्वास मुंबई सिटी एफसीचा तसेच भारतीय संघाचा बचावपटू मंदार राव देसाई याने व्यक्त केला.

जैव-सुरक्षित वातावरण, एफसी गोवानंतर मुंबई सिटी एफसीमधील कारकीर्द तसेच स्वत:च्या प्रवासाविषयी मंदारशी केलेली ही बातचीत-

अनेक खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणाबाबत तक्रार करू लागलेत, याविषयीचा तुझा अनुभव काय आहे?

कोणताही खेळाडू याबाबतीत तक्रार करू शकत नाही, कारण जैव-सुरक्षित वातावरण हे खेळाडूंच्याच फायद्याचे आहे. जैव-सुरक्षित वातावरणात राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नसती तर ही स्पर्धा यशस्वी होऊच शकली नसती. जैव-सुरक्षित वातावरणाचा माझा अनुभव खूप चांगला आहे. संघासोबत सराव केल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत गप्पा मारत असतो. हॉटेलमध्ये एकाच ठिकाणी राहावे लागत असले तरी आता त्याची सवय झाली आहे.

सहा वर्षे एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदा मुंबई सिटी एफसीकडून खेळताना काय भावना आहेत?

मी गोव्याचा असल्याने घरच्याच एफसी गोवाकडून व्यावसायिक स्तरावर फुटबॉल खेळताना मजा येत होती, पण मुंबई सिटी एफसी मला करारबद्ध करणार आहेत, हे ऐकून खूप खूश झालो होतो. आता मुंबई सिटी एफसीकडून खेळताना आम्ही सांघिक कामगिरीवर भर देत आहोत. माझ्याकडून संघाच्या विजयात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक सामन्यात विजयानंतर आमची पुढील सामन्याची तयारी सुरू होते. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यानंतर मी माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो.

यंदा मुंबई सिटी एफसीचे काय ध्येय आहे?

मुंबई सिटी एफसीने एकदाही ‘आयएसएल’ चषकावर नाव कोरलेले नाही. त्यामुळे यंदा ते स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबई सिटी एफसीची कामगिरी चांगली झाली असून आम्ही सुरुवातीला अग्रस्थान कायम राखले होते. मात्र आम्ही दुसऱ्या स्थानी पोहोचलो आहोत. त्याचबरोबर बाद फेरीतही कामगिरीत सातत्य राखून मुंबई सिटी एफसी जेतेपदावर नक्कीच नाव कोरेल, असा विश्वास आहे. आता पुढील दोन सामन्यांनंतर आमचे बाद फेरीचे चित्र स्पष्ट होईल. इंडियन सुपर लीगच्या जेतेपदासह एएफसी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षक सर्जियो लोबेरा ज्याप्रमाणे मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार आमचा खेळ सुरू आहे.

’ इंडियन सुपर लीगमधील तुझ्या कामगिरीविषयी काय सांगशील?

इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवाकडून खेळतानाच मला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सुरुवातीपासूनच ‘आयएसएल’मधील माझा अनुभव खूपच चांगला आहे. सहा वर्षे एफसी गोवाकडून खेळताना आम्ही पाच वेळा उपांत्य फेरीत धडक मारली. आता यंदाही मुंबई सिटी एफसीकडून खेळताना संघाची तसेच माझी कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळे एकूणच मी माझ्या कामगिरीविषयी बेहद खूश आहे.

’ ‘आयएसएल’नंतर भारतीय फुटबॉलचे भवितव्य कसे असेल?

करोनामुळे टाळेबंदीदरम्यान सर्वच खेळ जवळपास ठप्प झाले होते. युरोपातील फुटबॉल स्पर्धांमुळे अन्य देशांना आपापल्या लीग आयोजित करण्याचे बळ मिळाले. जैव-सुरक्षित वातावरणात चांगली तयारी करून ‘आयएसएल’मधील प्रत्येक संघ आपापल्या परीने लढा देत आहे. देशातील करोनाची स्थिती सुधारत चालली असून हळूहळू स्पर्धा आयोजनाला परवानगी मिळत आहे. त्यामुळे देशातही लवकरच फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित होतील.