भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेचा मानाचा ‘Breakthrough Star’ पुरस्कार मिळवणारी मनिका पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. इंचॉन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी मनिकाने आपल्याला मदत करणाऱ्या सर्व संघटना, प्रशिक्षक, मित्र-परिवाराचे आभार मानले.

2018 साल मनिकासाठी चांगलं गेलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मनिकाने भारताला महिला टेबल टेनिसमध्ये पहिलं सांघिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. चार वेळा सुवर्णपदक विजेत्या सिंगापूरच्या प्रतिस्पर्ध्याचा मनिकाने 3-1 ने पराभव केला होता. यानंतर वैय्यक्तिक प्रकारातही मनिकाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. याचसोबत महिला दुहेरी प्रकारात रौप्य तर मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदकाची कमाई करत मनिका बत्राने भारताचं स्थान भक्कम केलं होतं.

23 वर्षीय मनिका बत्राने यानंर इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शरथ कमालच्या साथीने मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. यादरम्यान जागतिक क्रमवारीत मनिकाने 52 हे आपलं सर्वोत्तम स्थान पटकावलं होतं.