विकास कृष्णन, सिमरनजीतला रौप्यपदक;  ९ बॉक्सर्सच्या ऑलिम्पिक समावेशाची पहिलीच वेळ

अम्मान (जॉर्डन) : जागतिक कांस्यपदक विजेता मनीष कौशिक (६३ किलो) आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेतून टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरलेला तो भारताचा नववा बॉक्सर ठरला. मात्र विकास कृष्णन (६९ किलो) आणि सिमरनजीत कौर (६० किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताचे या स्पर्धेतील सुवर्णपदक हुकले असले तरी समाधानाची बाब म्हणजे प्रथमच भारताचे ९ बॉक्सर्स ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. लंडनमध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे आठ बॉक्सर्स सहभागी झाले होते. तो विक्रम यंदा मोडीत निघाला. कौशिकने ऑस्ट्रेलियाच्या हॅरिसन गॅरसाइडला ४-१ नमवले. हॅरिसनचा चेहरा लढतीनंतर पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता.याआधी २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत कौशिकला हॅरिसनकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या स्पर्धेत दोघेही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले होते. मात्र पुन्हा पात्रतेच्या नियमांप्रमाणे त्यांना लढत खेळण्याची आणखी एक संधी मिळाली. भारताचा १०वा बॉक्सर मात्र ऑलिम्पिकला पात्र ठरण्यात अपयशी ठरला.

विकासची माघार

ऑलिम्पिकला पात्र ठरलेला बॉक्सर विकास कृष्णनने (६९ किलो) डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीतून माघार घेतली. सामन्याआधीच माघार घेतल्याने विकासला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विकासची अंतिम फेरीत जॉर्डनच्या झेयाद इशाशशी लढत होणार होती. डोळ्याला मार लागल्याने सामन्यातून माघार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी विकासला दिला.

ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे माझे स्वप्न आहे. माझे आणि कुटुंबीयांचे ऑलिम्पिकमध्ये सहभागाचे स्वप्न पूर्ण झाले. माझ्या प्रशिक्षकांचे माझ्या यशात मोठे योगदान आहे.’’ – मनीष कौशिक