भारताची युवा बॉक्सिंगपटू मनीषा मॉनने ५४ किलो गटात कझाकस्तानच्या गतविश्वविजेत्या डायना झोलामॅनला नमवण्याचा पराक्रम दाखवला. आता आणखी एका विजयासह तिला महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या पदकावर दावा करता येऊ शकेल.

२० वर्षीय मनीषाने डायनाला ५-० असे पराभूत केले. हरयाणाच्या मनीषाने डायनाला दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. वर्षांच्या पूर्वार्धात पोलंडला झालेल्या सिलेसियान महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मनीषाने तिला नामोहरम केले होते. आता उपांत्यपूर्व फेरीत मनीषाचे बल्गेरियाच्या स्टॉयका पेत्रोव्होशी गाठ पडणार आहे.

मागील वर्षी आशियाई कांस्यपदक जिंकणाऱ्या लोव्हलिना बोर्गोहॅनने ६९ किलो गटात पनामाच्या अ‍ॅथेयना बायलॉनचा ५-० असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिची ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट काये फ्रान्सिसशी सामना होणार आहे. याचप्रमाणे ८१ किलो गटात कचारी भाग्यवतीने जर्मनीच्या इरिना-निकोलिटा शॉनबर्गरचा ४-१ असा पाडाव केला. आर्यलडच्या केली हॅरिंग्टनने भारताच्या सरिता देवीचे आव्हान ३-२ अशा फरकाने संपुष्टात आणले. २८ वर्षीय केलीने सरिताला २९-२८ अशा फरकाने नामोहरम केले.

मी जेव्हा रिंगणात सामन्यासाठी उतरते, तेव्हा प्रतिस्पर्धी विश्वविजेता आहे की उपविजेता, याची मुळीच तमा बाळगत नाही. मी फक्त माझ्या खेळाकडे लक्ष देते आणि प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेते. हाच दृष्टिकोन माझा पुढील लढतीतसुद्धा असेल.   – मनीषा मॉन

मेरी कोम उपांत्यपूर्व फेरीत

एमसी मेरी कोमने रविवारी ४८ किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकस्तानच्या एयगेरिम केसेनायेव्हाचा ५-० असा पराभव केला आणि सहाव्या जागतिक सुवर्णपदकाकडे वाटचाल केली आहे. सध्या मेरी आणि आर्यलडची कॅटी टेलर यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच सुवर्णपदके आहेत.

‘‘बॉक्सिंगच्या रिंगणात काहीही घडू शकते. देशाला आणि चाहत्यांना माझ्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. त्यामुळे मी सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करीन,’’ अशी प्रतिक्रिया मेरीने व्यक्त केली.