नवी दिल्ली : भारताची युवा बॉक्सर मनीषा मौन हिने जागतिक स्पर्धेत दोन वेळा कांस्यपदक पटकावणाऱ्या अमेरिकेच्या ख्रिस्तिना क्रूझ हिच्यावर वर्चस्व गाजवत ५४ किलो वजनी गटाची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत हरयाणाच्या या २० वर्षीय बॉक्सरने दमदार पदार्पण केले.

मनीषाने आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या ख्रिस्तिना हिच्यावर पहिल्या फेरीत पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ३६ वर्षीय ख्रिस्तिनाला या सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच मनीषाने दिली नाही. तिन्ही फेऱ्यांवर हुकमत गाजविणाऱ्या मनीषाने हा सामना एकमताने (२९-२८, ३०-२७, ३०-२६, ३०-२६, २९-२८)जिंकला.

रविवारी रंगणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत मनीषाला कझाकस्तानच्या जगज्जेत्या डिना झोलामन हिच्याशी लढत द्यावी लागेल. पोलंड येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत डिनाला हरवल्यामुळे मनीषाचा आत्मविश्वास उंचावला आहे.

‘‘जागतिक स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार केल्याचा अभिमान वाटत आहे. येत्या फेऱ्यांमध्येही अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा माझा प्रयत्न असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत आक्रमक खेळ करत जोरदार ठोसे लगावल्यामुळे पंचांनी एकमताने माझ्या बाजूने निर्णय दिला,’’ असे मनीषाने सांगितले.