मध्य रेल्वेत नोकरीला असलेल्या मनीषा साळुंके या महाराष्ट्राच्या खेळाडूने आंतरराज्य मैदानी स्पर्धेतील तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. याच शर्यतीत तिची सहकारी मोनिका राऊतला कांस्यपदक मिळाले.
ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या ललिता बाबरच्या अनुपस्थितीत मनीषाने महाराष्ट्राला अव्वल यश मिळवून दिले. मूळच्या पुण्याच्या या खेळाडूने ही शर्यत १० मिनिटे ५५ सेकंदांत पार केली. मोनिकाने हे अंतर ११ मिनिटे ९ सेकंदात पार करीत कांस्यपदक पटकाविले. पुरुष गटात महाराष्ट्राच्या सचिन पाटीलने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली.
मध्य रेल्वेची आणखी एक खेळाडू के.सी.डीजाने पोल व्हॉल्टमध्ये रौप्यपदक पटकाविले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने ३.४० मीटपर्यंत उडी मारली. चार बाय १०० मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या महिलांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघात ऋचा पाटील, श्रद्धा घुले, दीपिका कोटियन व अंकिता गोसावी यांचा समावेश होता.