१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक २०१८ या स्पर्धेत अंतिम सामन्यात धडाकेबाज शतक झळकाणाऱ्या मनजोत कालरा याच्यावर वयचोरीच्या आरोपामुळे एका वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. अंतिम सामन्यात त्याने ठोकलेल्या शतकामुळेच भारताला विश्वचषक उंचावण्याची संधी मिळाली होती. पण १६ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील देशांतर्गत स्पर्धांमध्ये मनजोतने वय लपवल्यामुळे त्याच्यावर दिल्ली क्रिकेट बोर्डाचे लोकपाल यांनी १ वर्षाची रणजी सामन्यातील बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तो एकही रणजी सामना खेळू शकणार नाही.

मनजोत कालरा

 

“मला एका गोष्टीचे खूप आश्चर्य वाटते की नितीश राणाने जो गुन्हा केला, त्याच गुन्ह्यासाठी मनजोत कालराला शिक्षा करण्यात आली आहे. लोकपालांनी मनजोतबाबतचा निर्णय दिला आहे, त्यामुळे आम्ही त्याला संघात स्थान देऊ शकत नाही. ते मावळते लोकपाल आहेत. त्यांनी पदभार सोडण्याच्या आदल्या दिवशी रात्री ११.३० वाजता बंदीच्या शिक्षेचा निर्णय दिला. ही बाब खटकणारी आहे”, असे दिल्ली क्रिकेट बोर्डाचे सचिव विनोद तिहारा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

मनजोत कालरा हा नुकताच २३ वर्षाखालील स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्याचे वय २० वर्ष ३५१ दिवस होते. दिल्लीच्या रणजी संघात त्याला शिखर धवनच्या जागी समाविष्ट करून घेतले जाणार होते. पण त्याच्यावरील बंदीमुळे आता पुढील १ वर्षे तो खेळू शकणार आहे.