अंतिम फेरीत रशियाच्या एकतारिनाकडून पराभूत; भारताला चार पदके

भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिची विजयी घोडदौड अखेर रशियाच्या एकतारिना पाल्टसेव्हा हिने रोखली. लाइट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने मंजू राणी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली.

जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या हरयाणाच्या सहाव्या मानांकित मंजू राणीला दुसऱ्या मानांकित एकतारिनाकडून १-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. एम. सी. मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांना उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागल्यानंतर मंजू राणीने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती.

मंजू राणी आणि एकतारिना यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर भर दिल्यामुळे दोघींचेही पारडे जड मानले जात होते. मात्र रशियाच्या एकतारिनाने डाव्या बाजूने हुकचे अप्रतिम फटके लगावत बाजी मारली. दुसऱ्या फेरीत मंजू राणीने सरळ ठोसे लगावत एकतारिनाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. चाहत्यांचाही तिला पाठिंबा मिळू लागला. पण तिसऱ्या आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा अवलंबला. त्यामुळे पंचांना अनेक वेळा मध्यस्थी करावी लागली. तुल्यबळ लढतीनंतर या दोघींमध्ये विजयी कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पंचांनी एकतारिनाचा हात वर केल्यानंतर भारतीय गोटात निराशा पसरली. अचूक ठोसे लगावल्याचा फायदा एकतारिनाला झाला.

शनिवारी मी २०व्या वर्षांत पदार्पण करणार असल्यामुळे त्याआधीच रौप्यपदकाचे बक्षीस मला मिळाले आहे. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोमचा खेळ पाहून मी बॉक्सिंगकडे वळले. अतिशय खडतर परिश्रम करून त्यांनी आपली कारकीर्द घडवली आहे. आता कारकीर्दीच्या पहिल्याच टप्प्यावर मी घवघवीत यश मिळाल्याचा आनंद होत आहे.

– मंजू राणी

४ जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताने चार पदकांची कमाई केली. मंजू राणीने भारताला रौप्य तर एम. सी. मेरी कोम, जमुना बोरो आणि लव्हलिना बोर्गोहेन यांनी कांस्यपदक मिळवून दिले.