भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रस्तावित मालिकेच्या आयोजनाकरता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांची दुबईत भेट झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्यालयात ही भेट झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे गाइल्स क्लार्कही यावेळी उपिस्थत होते. या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही मात्र मालिकेच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने ही भेट सकारात्मक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात डिसेंबर महिन्यात क्रिकेट मालिका होणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात महिनाभरापूर्वी शहरयार खान मुंबईत मनोहर यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र भेटीआधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयावर मोर्चा नेत दौऱ्याचा निषेध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे मुंबई आणि त्यानंतर दिल्ली येथे होणारी बैठक रद्द करण्यात आली.

सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये मालिका होऊ शकत नसल्याने संयुक्त अरब अमिराती येथे ही मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पीसीबीने दिला होता. भारतात खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका शहरयार यांनी घेतली होती. दोन्ही बोर्डाकडून टोलवाटोलवी होत असल्याने या मालिकेचे भवितव्य अधांतरी झाले होते. मात्र दुबईत झालेल्या बैठकीमुळे मालिकेविषयी पुन्हा सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीत उभय संघांदरम्यान चार मालिका खेळणे अपेक्षित आहे. यापैकी चार मालिकांचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जबाबदारी असेल.

‘आम्हाला भारतात खेळायचे आहे. आम्ही पीसीबीला त्यासंदर्भात कळवले आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही’, असे शशांक मनोहर यांनी सांगितले.