भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी BCCI ने अर्ज मागवत आहे. महिला टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे BCCI नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी आता भारताचा माजी गोलंदाज मनोज प्रभाकर याने अर्ज केला आहे. जर मनोज प्रभाकरचा अर्ज शॉर्टलिस्ट झाला, तर त्याला मुलाखतीसाठी कपिल यांच्यासमोर बसावे लागणार आहे. एकेकाळी मनोज प्रभाकरने कपिल देव वर नाव न घेता मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. त्यामुळे या अर्जाबाबत काय निर्णय होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्ज हा प्रशिक्षकपदसाठी इच्छुक असल्याचे समजत होते. गिब्जने या पदासाठी आपला अर्ज केला असून त्याला लवकरच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, असे वृत्त CricketNext या संकेतस्थळाने दिले होते. त्यानंतर आता मनोज प्रभाकर यांनी या पदासाठी अर्ज केल्याचे समजते.

हर्षल गिब्जसोबतच, माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोअर, वेंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचं बोललं जातंय. मिताली राजसोबत झालेल्या वादानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी रमेश पोवार यांना आपला पाठींबा दर्शवला होता. मात्र पोवारने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाहीये. कॅरेबियन बेटांवर झालेल्या टी-20 विश्वचषकापर्यंत रमेश पोवार यांची महिला संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आलेली होती.

१४ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवार BCCI कडे अर्ज करु शकणार आहेत. २० डिसेंबरला भारताचे माजी खेळाडू कपिल देव आणि अंशुमन गायकवाड यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय हे प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेतील अंतिम निर्णय घेणार आहेत.