रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या पराभवानंतर टीम इंडियातून सध्या बाहेर गेलेल्या मनोज तिवारीने खोचक ट्विट करत निवड समितीला टोला लगावला आहे.

बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यातला निकाल हा धक्कादायक असून, अनुभव बाजारात विकत घेता येतो असा विचार करणाऱ्यांसाठी हा पराभव डोळे उघडणारा असल्याचं मनोजने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मनोज तिवारीने १२ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

अवश्य वाचा – आधी प्रदूषण आता चक्रीवादळ, दुसऱ्या टी-२० सामन्यावरही संकट कायम

दरम्यान, १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले.

अवश्य वाचा – BLOG : पंतचं अपयश ही कोणाची चूक?

सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. १ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने मुश्फिकुरने सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या. मुश्फिकुर ३६ चेंडूत ३८ धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला होता. त्याचा फटका भारताला बसला. भारताकडून चहर, चहल आणि खलीलने १-१ बळी टिपला.