भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीतकडे; मुंबईच्या सूरज करकेराला संधी; श्रीजेशचे पुनरागमन

माजी कर्णधार व  अनुभवी खेळाडू सरदार सिंग आणि आक्रमणपटू रमणदीप सिंग यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या भारताच्या पुरुष हॉकी संघातून डच्चू देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या या स्पर्धेत मनप्रीत सिंग भारताच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे. युवा गोलरक्षक सूरज करकेराला या संघात मिळालेली संधी ही मुंबई हॉकीप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.

नुकत्याच झालेल्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत ३१ वर्षीय सरदारने भारताचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत भारताला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील सरदारचा खेळ ढिसाळ झाला. चेंडूवर ताबा राखण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला आणि त्याच्या खेळाची गतीही मंदावल्याचे प्रशिक्षकांच्या निदर्शनास आले, त्यामुळे त्याला राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही.

मध्यरक्षक मनप्रीत संघाचे नेतृत्व सांभाळेल, तर उपकर्णधार म्हणून के. चिंगलेन्सेना काम पाहील. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि आक्रमणपटू एस. व्ही. सुनील यांचे पुनरागमन झाले आहे. या दोघांना अझलन शाह चषक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंड दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणाऱ्या दिलप्रीत सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांनी कामगिरीच्या जोरावर राष्ट्रकुलच्या संघात स्थान पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ‘ब’ गटात पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंड यांचा सामना करावा लागणार आहे. ७ एप्रिलपासून हॉकी सामन्यांना सुरुवात होणार आहे.

‘२०१७ च्या आशिया चषक स्पर्धेपासून ते आतापर्यंत झालेल्या स्पर्धामधील कामगिरीच्या जोरावर ही निवड करण्यात आली आहे. या कालावधीत संघबांधणीत आम्ही अनेक प्रयोग केले आणि राष्ट्रकुल स्पर्धेत आम्ही निवडलेले हे सर्वोत्तम खेळाडू आहेत,’ अशी प्रतिक्रिया मुख्य प्रशिक्षक शॉर्ड मारिन यांनी दिली.

मागील दोन राष्ट्रकुल स्पर्धात भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. मात्र या वेळी त्यात सुधारणा करण्याचा निर्धार कर्णधार मनप्रीतने केला आहे. तो म्हणाला, ‘साखळी गटात चांगली कामगिरी करण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे. साखळी गटात आम्हाला काही आव्हानात्मक संघांचा सामना करावा लागणार आहे. गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश कराण्यासाठी प्रयत्नशील आहोत. बाद फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना झाल्यास ती लढत आव्हानात्मक असेल.’

संघ

  • गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा
  • बचावपटू : रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, कोठाजीत सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास
  • मध्यरक्षक : मनप्रीत सिंग, के. चिंगलेन्साना, सुमित, विवेक सागर प्रसाद
  • आघाडीपटू : आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, गरुजट सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, दिलप्रीत सिंग.